कल्याण: कल्याण जवळील आंबिवली माणी अटाळी भागात काळु नदीच्या काठी मौज म्हणुन एका लघुपटाचे चित्रीकरण पाहण्यासाठी रात्रीच्या वेळेत गेलेल्या एका ११ वर्षाच्या बालिकेला चित्रीकरण संंपल्यानंतर घरी जाऊ न देता, या भागातील एका दुकानदाराने जबरदस्तीने आपल्या दुकानात बोलावून घेतले. रात्रभर तिच्यावर दुकानात लैंगिक अत्याचार केले. या दुकानदाराच्या तावडीतून सुटल्यावर घाबरलेल्या बालिकेने घरी आल्यानंतर रात्री घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर या बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी दुकानदारा विरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

पीडित बालिका आंबिवली भागात आपल्या कुटुंबीयांसह राहते. ती याच भागातील एका शाळेत शिक्षण घेते. शाळेला सुट्टी असल्याने सोमवारी रात्री आठ वाजता बालिकेने आपल्या आईला मी मैत्रिणीच्या घरी जाते असे सांगितले. त्यानंतर बालिकेने घराच्या परिसरात असलेल्या काळु नदीकाठी एका लघुपटाचे सुरू असलेले चित्रीकरण पाहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. चित्रीकरण पाहत असताना त्या भागात एका दुकानदाराचे दुकान होते. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दुकानदाराने पीडित बालिकेला आपल्या दुकानात बोलावून घेतले.

बालिका दुकानात येताच दुकानदाराने दुकानाचे मुख्य लोखंडी दार बंद करून घेतले.बालिकेने आपणास घरी जायाचे आहे असे दुकानदाराला सांगितले. दुकानदाराने तिला दुकानात थांबण्याची सक्ती केली. या बालिकेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराला बालिकेला कडाडून विरोध केला. दुकानदाराने बळाचा वापर करून याप्रकरणी तु ओरडा केलास तर तुला मारहाण करेन, तुझी बदनामी करीन अशी धमकी बालिकेला दिली. मारण्याच्या भीतीने बालिकेने ओरडा केला नाही. तोपर्यंत रात्रभर बालिकेचे कुटुंब पीडित बालिकेचा अटाळी, आंबिवली भागात शोध घेत होते. ती आढळून आली नाही. सकाळच्या वेळेत पीडितेचे कुटुंबीय शोध घेत असताना त्यांना बालिका घराच्या परिसरात आढळून आली.

ती अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होती. खूप थकल्यासारखी वाटत होती. बालिकेला पाहून कुटुंबीय हादरले. बालिकेच्या कुटु्ंबीयांनी विश्वासात घेऊन तिला विचारले. त्यावेळी तिने आपण काळू नदीकाठी मौज म्हणून चित्रीकरण पाहण्यासाठी गेले होते. तेथे रात्रीच्या वेळेत एका दुकानदाराने आपणास दुकानात बोलावून लैंगिक अत्याचार केल्याची माहिती बालिकेने कुटुंबीयांना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही माहिती समजताच बालिकेच्या आई, वडिलांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात आंबिवली माण अटाळातील बालिकेशी गैरवर्तन करणाऱ्या दुकानदारा विरुध्द तक्रार केली आहे. डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दोन दिवसापूर्वी टिटवाळा बल्याणी भागात एका तरूणीवर पाच जणांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे.