विषय छोटा असला तरी त्यातून फार मोठा आशय सांगता येतो. साहित्यामध्ये जे स्थान चार ओळींच्या कवितेचे, तेच दृकश्राव्य माध्यमात लघुपटाचे. ‘पॉइंट ऑफ व्ह्य़ू’ पाहिल्यावर या माध्यमाची ताकद लक्षात येते. अगदी छोटय़ा घटनेतही सत्त्व आणि तत्त्व कसे टिकवून ठेवता येते, याचे मनोज्ञ दर्शन यातून घडते.. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घडय़ाळात दुपारचे १२.३० वाजले आहेत. पादचारी पुलावर एक लहान मुलगा पेन, पेन्सील व इतर काही वस्तू विकत असतो व ते विकता विकता तो त्याच्या शाळेचा अभ्यासही करत असतो. त्याच पुलावर काही अंतरावर एक तरुण भिकारी बसलेला असतो. पुलावरून ये-जा करणारी काही माणसं त्या भिकाऱ्याला भीक देतात तर काही माणसं त्या मुलाकडून वस्तू विकत घेत असतात. काही वेळानंतर एक आई आपल्या मुलीला शाळेतून घरी घेऊन जात असताना ती मुलगी तिच्या आईला त्या मुलाकडून पेन घेण्याचा आग्रह करते. पेन देत असताना त्या मुलाचं लक्ष त्या मुलीच्या गणवेशाकडे जातं व त्याच्या लक्षात येतं की, त्याच्या शाळेची वेळ झाली आहे व तो त्याच्या बहिणीची अतुरतेने वाट बघू लागतो.

तितक्यात त्याची लहान बहीण शाळेतून धावत धावत येते. ती येत असताना तिचा धक्का पुलावरील एका गृहस्थाला लागतो. तो तिला सावरतो आणि ती त्याला एक स्मितहास्य देऊन घाई घाईत निघून जाते. ती वाट बघत असलेल्या आपल्या भावाजवळ येते आणि आपल्या दप्तरातील वह्य़ा-पुस्तकं काढून दप्तर भावाला देते आणि वस्तू विकायला बसते. तिचा भाऊ  त्याची वह्य़ा-पुस्तकं घाईघाईने त्या दप्तरात घालून शाळेसाठी निघू लागतो. हा सगळा प्रकार ती धक्का दिलेली व्यक्ती बघत असते. ते बघता त्याच्या लक्षात येते की, हे दोघे भाऊ-बहीण असून, काम करून पोट भरतात आणि शाळेला जातात. त्याला त्यांची दया येते आणि त्यांना मदत व्हावी म्हणून इच्छा नसतानाही तो वस्तू घेण्यासाठी त्या मुलीकडे वळतो. तो एक दहा रुपयांचे पास ठेवण्याचे कव्हर विकत घेतो आणि उरलेले १० रुपये तिला मदत म्हणून तिच्या हातात ठेवून निघून जातो. ती जेव्हा क्षणभर विचार करून, त्या गृहस्थाकडे जाते तेव्हा काय होतं ? हे ध्यास कलाविष्कार या संस्थेच्या ‘पॉइंट ऑफ व्ह्य़ू’ या लघुपटाच्या शेवटी आपल्याला कळतं.

कलेतून अनेक गोष्टींचा उगम होतो. उत्तम कलाकृती घडण्यासाठी प्रचंड ध्यास असावा लागतो. तसे नेमके ध्येय आणि उद्दिष्ट मनात ठेवूनच स्वप्निल दळवी यांनी ध्यास कलाविष्कार या संस्थेची सुरुवात केली. ते स्वत: या संस्थेचे अध्यक्ष असून शैलेंद्र दळवी हे या संस्थेचे निर्माते आहेत. संस्था सुरू केल्यानंतर श्रीकांत जामुंदे आणि स्वप्निल दळवी यांनी अनेक तरुण कलाकारांचा संघ उभा केला व संस्थेतर्फे अनेक नाटकं, एकांकिका, पथनाटय़ं अशा विविध कलाकृती लोकांसमोर सादर केल्या. मात्र कलाकारांची कला ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लघुपट हे उत्तम माध्यम आहे, हे कळताच आपणही एक उत्तम लघुपट करू या अशी कल्पना संस्थेचा सचिव श्रीकांत जामुंदे याने सगळ्यांसमोर मांडली. संस्थेचा होकार मिळताच सगळ्यांची शोधाशोध सुरू झाली ती लघुपट करण्यासाठी लागणाऱ्या कथेची. श्रीकांत एकदा बाजारात त्याच्या मित्राची वाट पाहत उभा होता. काही अंतरावर एक छोटीशी आठ-दहा वर्षांची मुलगी फुलं विकताना त्याला दिसली. श्रीकांतचं लक्ष तिच्याकडे गेलं. तेव्हा तिच्यासोबत घडलेला प्रसंग, तिने त्यावर दिलेली प्रतिक्रिया त्याने दुरूनच पाहिली. घरी गेल्यावर त्याने हा सगळा प्रसंग कथेच्या माध्यमात लिहून काढला व अशा प्रकारे ‘पॉइंट ऑफ व्ह्य़ू’ हा लघुपट तयार झाला. थोडक्यात ‘पॉईंट ऑफ व्ह्य़ू’ एका सत्य घटनेवर आधारित आहे.

कथा मिळताच सुरुवात झाली ती लघुपटासाठी लागणाऱ्या कलाकारांची. संस्थेचा स्वत:चा नाटकाचा संघ असल्यामुळे कलाकार शोधायला जास्त वेळ लागला नाही. सई डिंगणकर या अवघ्या आठ वर्षांच्या मुलीने लघुपटातील मुख्य अभिनेत्रीची अर्थात बहिणीची भूमिका पार पाडली. कौस्तुभ तारपे याने भावाची भूमिका साकारली. मनश्री पालकर हिने मुलीची तर सुचिता जोशी हिने आईची भूमिका पार पाडली. अल्पेश शिंदे याने बाजूला बसलेल्या भिकाऱ्याची तर स्वप्निल दळवी याने मदत करणाऱ्या व्यक्तीची भूमिका पार पाडली.

कलाकार निश्चित झाल्यावर तांत्रिक विभाग कोण सांभाळणार असा प्रश्न समोर होता. श्रीकांतनेच या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन केलं आणि कुणाल गोगरकर याने संपूर्ण लघुपटाचं छायाचित्रण केलं आहे. सिद्धेश कोटावडेकर याने संकलनाची जबाबदारी पार पाडली. लघुपटाचं संपूर्ण संगीत हे अनिकेत पाष्टे याने केलं तर स्थिर छायाचित्रणाची जबाबदारी खजिनदार पूजा माळकर हिने सांभाळली. या सगळ्यांबरोबर संस्थेचा सचिव कुणाल तेजाळे या तरुणाचीही बरीच मदत झाली.

‘पॉइंट ऑफ व्ह्य़ू’ या लघुपटाने पुणे इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल २०१६ मध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. म.न.से. शॉर्ट फिल्म फेस्टिवल २०१६ मध्ये या लघुपटाला पब्लिक चॉइस अवॉर्डने गौरवण्यात आलं तर नांदेड येथील नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये ऑफिशियल निवडही करण्यात आली.

‘पॉइंट ऑफ व्ह्य़ू’ हा लघुपट आपण ध्यास कलाविष्कार या संस्थेच्या ऑफिशिअल यूटय़ूब पेजवर पाहू शकतो. त्याच बरोबर लघुपटाची अधिक माहिती संस्थेच्या ध्यास कलाविष्कार या नावाच्या फेसबुक पेजवरही उपलब्ध आहे. सध्या ध्यास कलाविष्कार ‘स्वच्छ भारत’ या विषयावर लघुपट तयार करण्याचे काम करीत आहे व लवकरात लवकर अजून चांगले विषय घेऊन चांगले लघुपट प्रेक्षकांसमोर सादर करत राहणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Short film point of view
First published on: 08-09-2016 at 03:02 IST