डोंबिवली – शतकोत्तर महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या येथील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त यावर्षी ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना घेऊन स्वागत यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. हिंदू धर्म संस्कृतीचे व्यापक रूप, त्याचे प्रतिबिंब चित्ररथ, दिंड्या, देखावे माध्यमातून प्रदर्शित केले जाणार आहे.

जगभरात सुरू असलेल्या घटना, घडामोडी या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने वसुधैव कुटुंबकम् हा विचार जगभर मांडला जात आहे. वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना घेऊन यावर्षी नववर्ष स्वागत यात्रेचे नियोजन करण्याचा निर्णय श्री गणेश मंदिर संस्थानने घेतला आहे. नववर्ष स्वागत यात्रेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. या दोन्ही वरिष्ठ नेत्यांची स्वागत यात्रेतील उपस्थिती विशेष असणार आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे स्थानिक आमदार म्हणून त्यांचा स्वागत यात्रेतील सहभाग सक्रिय आहे.

हेही वाचा – संसदेत समान प्रतिनिधित्वाचे विधेयक प्रलंबित; ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी व्यक्त केली खंत

निसर्ग, पर्यावरण संवर्धन, जल संवर्धन, कचरा मुक्त अभियान, असे सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांबरोबर पंचमहाभुतांची दिंडी, शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांच्या संकल्पनेतील देखावे चित्ररथाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहेत. स्वागत यात्रेचे हे पंचवीसावे वर्ष आहे. तसेच गणेश मंदिराच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. हा अनोखा योग साधून अनेक धार्मिक, सामाजिक, सांस्कृितक कार्यक्रमांची वर्षभरातील कार्यक्रमांची आखणी मंदिर संस्थानतर्फे केली जात आहे.

हेही वाचा – अंबरनाथ : ठाकरे समर्थकांकडूनच उद्धव, आदित्य ठाकरेंचे छायाचित्र शाखेबाहेर; उरलेले उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारीही शिवसेनेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वागत यात्रेनिमित्त महिला, युवा आणि विद्यार्थी गटासाठी तीन गटांमध्ये कौशल्य, क्षमता सिद्ध करणाऱ्या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. समाज माध्यमातील यूट्यूबसाठी रील, लघुपट स्पर्धा हे या स्पर्धेचे विशेष असणार आहे, असे संयोजकांनी सांगितले. स्वागत यात्रा पूर्वसंध्या कार्यक्रमांचा शुभारंभ स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या उपस्थितीत होणार आहे. स्वागत यात्रेनिमित्त आठवडाभर श्रीराम नाम जप यज्ञ, सामुदायिक गीता पठण, अथर्वशीर्ष पठण, दीपोत्सव, विविध प्रांतांमधील महिलांची भजने, पाककला स्पर्धा, गीत रामायण कार्यक्रम, महारांगोळी, दुचाकी फेरी, प्रभू रामचंद्रांच्या जीवनावरील नृत्याविष्कार, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यक संस्था आणि विविध स्तरातील नागरिक यांचा स्वागत यात्रेत हिरीरीने सहभाग असणार आहे, असे गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक यांनी सांगितले.