नालासोपाऱ्याच्या वाघोली गावात हा हिरवागार तुकडा पाहायला मिळतो. स्थानिक सामवेदी समाजातील फुलारे-नाईक कुटुंबाने अतिशय कल्पकतेने त्यांची ही जमीन विकसित केल्याचं पाहायला मिळतं. याच पट्टय़ातील काही गुंठय़ात अतिशय सुंदर शनिमंदिर निर्माण करण्यात आले आहे. हे मंदिर कौलारू आहे. त्यामुळे एखाद्या जुन्या मंदिराला भेट दिल्याचा आनंद मिळतो. मंदिरात प्रशस्त सभामंडप, त्यानंतर देवघरात काळ्या पाषाणातील शनीची मूर्ती आहे. अष्टकोनी मंदिराच्या बाहेर एक छोटीशी दीपमाळही आहे. एका बाजूला दीपमाळ आणि दुसऱ्या बाजूला शनिशिंगणापूरच्या धर्तीवर इथे एक चौथरा बांधण्यात आला आहे. मारुतीरायाची मूर्ती इथे विराजमान आहे. दर शनिवारी सायंकाळी जेव्हा ही दीपमाळ पूर्ण प्रज्वलित होते तेव्हा ते दृश्य डोळ्यांचं पारणं फेडतं. ज्यांना शनिशिंगणापूरला जाता येत नसेल त्यांना या मंदिरात शनिशिंगणापूरला भेट दिल्याचा आनंद नक्कीच काही प्रमाणात घेता येईल. इथे चौथऱ्यावर मारुतीरायाच्या पायाशी वाहिलेल्या तेलात औषधी वनस्पती मिसळून तेच तेल रुग्णांना मालीश करण्यासाठी विनामूल्य प्रसादरूपात दिल जातं. तेल वाया जाऊ  न देता मंदिर प्रशासनाच्या वतीने अशा पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवला जातो. मंदिराच्या भिंतीवर स्तोत्र, सुविचार यांचे फलक लावलेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा संपूर्ण परिसरच खूप प्रसन्न आहे. आजूबाजूला फुले आणि फळांपासून, विविध प्रकारची झाडं असल्याने उन्हाच्या कडाक्यातही इथे मात्र सुखद गारवा अनुभवता येतो. मंदिर प्रशासनाच्या वतीने आणि या परिवाराच्या वतीने या परिसरात विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. जवळपास दोन अडीज हजार झाडे इथे गेल्या काही वर्षांत लावण्यात आली आहेत. जमेची बाजू ही की इथे फिरण्याची, तुमच्या आवडीप्रमाणे एखाद्या झाडाखाली विसावण्याची मुभा आहे. अगदी मंदिरात दर्शन घेतानासुद्धा निवांत मनसोक्त दर्शन घेण्याचा आनंद श्रद्धाळू मंडळींना घेता येतो.

मंदिर प्रशासन अनेक बाबतीत सामाजिक उत्तरदायित्व निभावत असतं. त्याचाच भाग म्हणून महिला बचत गटाच्या वतीने इथे पूजा साहित्य विकलं जातं. त्याचप्रमाणे इथले पारंपरिक स्वादिष्ट जेवण, नाश्ता यांचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे इथे खवय्यांची चांगलीच सोय झालेली पाहायला मिळते. म्हणजे झुणका-भाकर ते चायनीज अशी रेंज इथे मिळते. पारंपरिक चटण्या, मसाले यांची विक्रीही या बचत गटाच्या महिला इथे करतात. इथे प्रसाद म्हणून बरेचदा वेगवेगळी रोपं किंवा झाडांच्या बिया दिल्या जातात. हाही एक अनोखा उपक्रम म्हणायला हवा.

हा संपूर्ण परिसर एकाच कुटुंबाच्या मालकीचा असल्याने असेल कदाचित तो अजूनही शहरीकरणापासून वंचित आहे. आजही इथे पारंपरिक पद्धतीने शेती आणि बागायती केली जाते. केळी, नारळाच्या बागा, पालेभाज्या, जाम, जांभळासारख्या झाडांमधून मनमुराद भटकण्याचा आनंद इथे पर्यटकांना घेता येतो. एक छोटंसं तळंही इथे आहे. ज्यात फुललेली कमळं पाहून सगळा थकवा, ताण मागे कधी सरतो ते कळत नाही.

जेष्ठ मंडळींसाठी इथे एक सभागृह आहे. जिथे विविध मशिन्स आहेत. ज्यामुळे त्यांना तिथेही काही काळ या मशिन्समध्ये दुखणारे हात-पाय यांना मसाज घेता येतो. याच परिसरात या कुटुंबीयांनी आईची स्मृती अनोख्या पद्धतीने जपली आहे. मणिबाई भवन नावाने असलेल्या इथल्या टुमदार एकमजली वास्तूत अनेक कलात्मक वस्तू पाहायला मिळतात. इथला लाकडी जिना, झोपाळा पाहण्यासारखा आहे. हे भवनही पर्यटकांना पाहण्यास खुलं करण्यात आलं आहे.

पहाटे साडेपाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत मंदिर आणि हा आजूबाजूचा परिसर पर्यटकांना फिरण्यासाठी खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एक दिवसाची ही पिकनिक करायला काहीच हरकत नाही. दुसरं म्हणजे इथून जवळच कळंब बीच आहे. तसंच जवळच असलेलं ऐतिहासिक शंकर मंदिर, दत्त मंदिर, स्वामी समर्थ मठही भेट देण्यासारखं आहे. शहराच्या जवळ असा छानसा हिरवा निसर्ग, मंदिर, वृक्ष वेली एकाच ठिकाणी बघायला मिळत असेल, तेही उत्तम जेवणाच्या सोयीसह तर आणखी काय हवं नाही का, नालासोपारा मेकडून साडेचार किलोमीटरवर हे शनिमंदिर आहे. स्थानकावरून इथे जाण्यासाठी बस, शेयर किंवा वैयक्तिक रिक्षाचे पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय स्वत:च्या वाहनानेही इथे जाता येते.

– तृप्ती राणे

truptiar9@gmail.com

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shri shani mandir in thane
First published on: 21-04-2018 at 00:40 IST