ठाणे : भारताच्या आणि जगाच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे सिंधू सरस्वती संस्कृतीचा शोध. २० सप्टेंबर १९२४ रोजी या महान शोधाची घोषणा झाली आणि मानवी इतिहासाचा एक नवा अध्यायच जगासमोर उघडला गेला. हडप्पा संस्कृती या नावाने देखील ओळखली जाणारी ही संस्कृती आजही संशोधक, इतिहासवेत्ते आणि सामान्य नागरिक यांना आकर्षित करते. यंदा या घटनेला १०१ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ठाण्यात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सिंधू सरस्वती संस्कृतीच्या २० सप्टेंबर १९२४ रोजी झालेल्या शोधामुळे भारताला जगाच्या इतिहासात विशेष स्थान मिळाले. या संस्कृतीतून मिळालेल्या नगररचना, रस्ते, जलव्यवस्था आणि सांडपाण्याची व्यवस्था यामुळे प्राचीन भारत अत्यंत प्रगत नागरी जीवन जगत होता हे सिद्ध झाले. त्याचबरोबर सापडलेल्या मूर्त्या, दागिने, खेळणी, मुद्रा यांतून त्या समाजाची कलात्मकता आणि तांत्रिक कौशल्याचे दर्शन घडते. अजूनही वाचण्याशिवाय आलेली सिंधू लिपी हे या संस्कृतीचे मोठे गूढ असून तिच्या उलगडण्यानंतर या समाजाची धार्मिक, राजकीय आणि सामाजिक रचना अधिक स्पष्ट होऊ शकेल. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात या शोधाचे महत्त्व अधोरेखित करताना संशोधक असे मानतात की, हा शोध केवळ भारतासाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी अभिमानाचा विषय आहे. यंदा या शोधाला १०१ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे आणि के. जी. जोशी-बेडेकर महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात व्याख्यानाचे आयोजन केले आहे.

नेमका कार्यक्रम काय ?

प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे आणि के. जी. जोशी-बेडेकर महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिंधू सरस्वती संस्कृती’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी संस्कृतीचे अनेक पैलू व्याख्यानातून उलगडले जाणार आहेत. पुण्यातील डेक्कन कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक आणि सिंधू सरस्वती संस्कृतीच्या उत्खनन मोहिमांचे तज्ज्ञ डॉ. प्रबोध शिरवळकर हे मार्गदर्शन करणार आहेत. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून या व्याख्यानाला ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर आणि डॉ. महेश बेडेकर यांनी केले आहे.

कार्यक्रम कधी आणि कुठे

हे व्याख्यान शनिवार, २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ठाण्यातील के. जी. जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या पाणिनी सभागृहात होणार आहे.