उल्हासनगर : जलप्रदूषण, ध्वनीप्रदूषण आणि इतर सामाजिक समस्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या हिराली फाउंडेशनच्या प्रमुख आणि वकिल सरिता खानचंदानी यांनी गुरुवारी दुपारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सात मजली इमारतीवरून उडी मारून जीव देण्याच्या या घटनेमुळे उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

गुरुवारी दुपारी कॅम्प- ४ परिसरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोमा अपार्टमेंट इमारतीवरून सरिता यांनी उडी घेतली. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, त्या आपल्या कार्यालयातून थेट इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेल्या आणि काही क्षण टेरेसवर बसून प्रार्थना करत अचानक खाली उडी मारली. हा धक्कादायक प्रसंग जवळच्या इमारतीतील काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला.

गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ बालाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कॅम्प-३ येथील मॅक्सिलाइफ रुग्णालयात आणि नंतर डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून सरिता खानचंदानी या वालधुनी नदीतील प्रदूषण, धार्मिक उत्सवांमधील ध्वनीप्रदूषण, कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकी, तसेच बेकायदेशीर होर्डिंग्ज यांसारख्या अनेक सामाजिक समस्यांवर सातत्याने लढा देत होत्या. वकिली व्यवसायासोबतच त्यांनी न्यायालयीन लढ्यांद्वारे प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देत शहरातील अनेक प्रश्नांवर कार्य केले होते. तथापि, इतक्या लढवय्या स्वभावाच्या खानचंदानी यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

गुरुवारी त्यांच्या कोणासोबत वाद झाला होता का, किंवा इतर काही कारण होते का, याचा तपास विठ्ठलवाडी पोलिस सुरू आहेत. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.