लघुपटाच्या पहिल्या दृश्यामध्ये आपल्याला एक लहान गोड मुलगी भल्यामोठय़ा घराच्या कोपऱ्यात तिच्या बाहुलीसोबत खेळताना दिसते. थोडय़ा वेळाने तिथे एक व्यक्ती तिच्यासमोर येऊन उभी राहते, ज्याला पाहून ती मुलगी खूप घाबरते आणि रडू लागते. कुठल्याच प्रकारची दयामाया न दाखवता ती व्यक्ती त्या लहान चिमुरडीवर बलात्कार करते. दुसऱ्या दिवशी ती मुलगी शाळेत एकटीच वर्गाच्या कोपऱ्यात दु:खी होऊन बसलेली असते. वर्गातली बाकी मुले शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देत असतात. वर्गात शिक्षिका मुलांना आई, बाबा अशा नात्यांबद्दल शिकवत असतात. तिच्यासह बाकी मुलेसुद्धा ते वहीत लिहून घेत असतात. पण जेव्हा शिक्षक ‘काका’ या नात्याविषयी लिहायला सांगतात, तेव्हा या मुलीने तिच्या वहीवर टिपलेला शब्द प्रेक्षकांचे डोळे भरून आणतो. वहीमध्ये ती नेमके काय लिहिते याचा खुलासा आपल्याला ‘विळखा’ या लघुपटाच्या शेवटी होतो.

लहान मुलांचे लैंगिक शोषण या विषयावर बेतलेला हा लघुपट पूर्णत: अमूर्त (अ‍ॅब्सट्रॅक्ट) पद्धतीने चित्रित केला गेला आहे. म्हणजे मुलगी किंवा तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा न दाखवता प्रकाशयोजना आणि दृश्यांच्या (व्हिज्युअल्स) माध्यमातून तिथे घडणाऱ्या प्रसंगांची एकंदर कल्पना प्रेक्षकांना येते. त्यामुळे ती पाहताना कोणाला अश्लील प्रकार पाहिल्याची किंवा दाखवल्याची भावना निर्माण होत नाही; परंतु ध्वनी आणि दृश्यांच्या माध्यमातून पाहणाऱ्याचे मन हेलावून जाते आणि विषयाचे गांभीर्य लोकांपर्यंत सहजतेने पोहोचते. हे भाव दाखवण्यामध्ये लघुपटाचा दिग्दर्शक नीलेश कुंजीर यशस्वी झाला असून अनेक स्पर्धामध्ये त्याच्या या कलेचे विशेष कौतुक झाले आहे.
‘विळखा’ या लघुपटाचा दिग्दर्शक नीलेश कुंजीर याला लहानपणापासून सिनेमा पाहण्याची प्रचंड आवड होती आणि आपण याच क्षेत्रात आपले भविष्य घडवायचे असे त्याने ठरवले होते. त्यासाठी त्याने वरळी येथील ‘रहेजा स्कूल ऑफ आर्ट’मधून कमर्शियल आर्ट विषयातील शिक्षण पूर्ण केले आहे. २००८ मध्ये नीलेश आणि त्याचे मित्र मंगेश डावखरे, विक्रम आणि अमर ढेंबरे यांनी मिळून ‘वळणावरती’ नावाचा लघुपट करण्याचे ठरविले. आपल्या गावापासून कितीही दूर गेलो तरी गावाबद्दलची, बालपणाची ओढ प्रत्येकाला असते, असा त्या लघुपटाचा विषय होता. दिग्दर्शनाबद्दल तसेच या क्षेत्राबद्दल जास्त माहिती नसल्याने त्यांनी फक्त त्या लघुपटाची कथा लिहिली आणि निर्माते म्हणून काम पाहिले. महेश घाटपांडे यांनी त्याचे दिग्दर्शन केले. संजय खापरे आणि समीर विजय या दोघांच्या मुख्य भूमिका लघुपटात होत्या. त्या वेळी प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी नवीन होती, पण त्या एका लघुपटाने खरे तर त्यांचा पाया मजबूत केला आणि लघुपट बनविण्याची त्यांची आवड वाढत गेली.
त्यातूनच २०१० मध्ये नीलेश व त्याच्या या मित्रांनी मिळून ‘वननेस’ नावाचे प्रॉडक्शन हाऊस स्थापन केले. कोणतेही मोठे काम करताना तुम्ही एकटे ते कधीच करू शकत नाही. त्यासाठी एक उत्तम टीम तुमच्या सोबत असणे गरजेचे असते. चित्रपट क्षेत्रात तर ते हमखास लागू होते. ‘वननेस फिल्मस’ हे नाव पण त्यावरूनच त्यांना सुचले. ‘वननेस’ म्हणजे एकता, एकजूट. आजपर्यंत ‘वननेस’च्या नावावर डझनभर प्रोजेक्ट्स आहेत, त्याचे कारण म्हणजे उत्तम टीम आणि मेहनत. वननेस फिल्मसचा प्रवास जरी २०१० ला सुरू झाला तरी खरी सुरुवात झाली २०११ रोजी. ‘भ्रम’ या लघुपटाने वननेस फिल्म्सने श्रीगणेशा केला त्या वेळी नीलेशचा मित्र अमृत अमरनाथ हा निर्माता म्हणून त्याच्या पाठीशी उभा राहिला. लघुपट बनवताना तुमच्याकडे विषय असतो. कलाकार आणि इतर सर्व गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात. पण त्यासाठी लागणारा निर्माता सर्वात महत्त्वाचा असतो, कारण लघुपटातून आर्थिक फायदा होईलच याची शाश्वती बिलकूल नसते. आपल्याला जेव्हा प्रसिद्धी मिळते, आपण मोठे होतो, तेव्हा कोणीसुद्धा आपल्या पाठीशी सहज उभे राहू शकते, परंतु आपण कोणत्याही गोष्टीला सुरुवात करताना आपल्याला गरज असते ती एका आधाराची. जो आपल्यावर विश्वास ठेवेल. आपल्यातील कलात्मकता जाणून आपल्याला एक संधी देईल. ज्याची त्या वेळी प्रत्येकाला गरज आहे. तीच संधी अमृतने, त्याच्या आई-वडिलांनी दिली. त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यांची सोबत यामुळेच आज वननेस फिल्म्स उभी आहे.
वननेसचे प्रकल्प आणि यश..
वननेसने भ्रम (२०११), आय कॅन (२०१२), विळखा (२०१३) हे लघुपट केले आहेत. तसेच रेन ऑफ लव्ह, मन जडले असे, गर्जा महाराष्ट्र, विनवितो मी श्रावणा, मोरया, क्या हसीन रात है हे दृश्य अल्बम केले. गर्जा महाराष्ट्र हे गीत १ मे २०१३ रोजी अनेक मराठी वाहिन्यांवर प्रदर्शित झाले. नुकत्याच एका जाहिरात संस्थेने हे गाणे त्यांच्या चित्रफितीसाठी वापरायचे ठरविले आहे. ‘विळखा’चे प्रदर्शन तब्बल १५ ठिकाणी झाले आहे. एगॉग शॉर्ट फिल्म फेस्टिवल, नेरुळ येथे त्याला कथा आणि पटकथा लेखनासाठी पुरस्कार देण्यात आला. एम इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म कार्निव्हलमध्ये पूर्ण जगातून निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट दहा लघुपटांमध्ये ‘विळखा’ ही एकमेव भारतीय फिल्म होती. एम इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म कार्निव्हलमध्ये बेस्ट इंडियन फिल्म हा पुरस्कार अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते ‘विळखा’ला मिळाला. एगोग फिल्म फेस्टिवल, नवी मुंबई येथे उत्कृष्ट कथा आणि पटकथा (स्क्रीन प्ले) आणि रित फिल्म फेस्टिवल येथे बेस्ट ज्युरी चॉइस असे पुरस्कार मिळाले आहेत. नीलेशने नुकतेच दोन हिंदी लघुपट पूर्ण केले आहेत ‘अ डार्क स्पेक्ट्रम’ आणि ‘दो पल’ अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही लघुपट विविध फिल्म फेस्टिव्हलला पाठवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्याशिवाय प्रतापसिंह शिंदे यांनी लिहिलेल्या गीतांच्या नवीन कोऱ्या अल्बमचे रेकॉर्डिग १४ आणि १५ एप्रिलला झाले. हृषीकेश रानडे, प्रियांका बर्वे गीत गाणार आहेत आणि सोहम पाठक याने संगीत दिले आहे. त्याच्या व्हिडीओ दिग्दर्शनाची जबाबदारी नीलेशवरच आहे आणि याच वर्षी मराठी चित्रपटाची तयारी त्याने सुरू केली आहे.

‘वननेस’ फिल्म्सची टिम..
वननेस फिल्म्सच्या प्रवासात काही लोक त्यांच्याशी जोडली गेले. मकरंद पोतदार, शशी चव्हाण, अभी वेदपाठक, दीपक गोसावी, विपुल साळुंखे, मधुर शिंदे, ललित सौदाने, सुशील चव्हाण, देवेंद्र निखार्गे, राहुल कुलकर्णी, रियाज मुलानी, वैष्णवी जाधव, नितीन सावंत, प्रतापसिंह शिंदे, प्रथमेश रांगोळे, धनराज वाघ, अजय वाघमारे, अनुप पाटील, हिमाली दिघे, आभास नागवेकर, जागेश्वर ढोबळे, सुबोध नारकर, योगेश दीक्षित, गिरीश नाईक, मंगेश डावखरे, रुपेश पवार, प्रशांत कांबळे, रसिका आणि संकेत आजरेकर, अभिषेक साळवी, सुजीत जगताप, मोईल शेख, हेअर प्रफुल कांबळी, कोमल म्हात्रे, पूनम मुळीक, विजय गुजर, प्रशांत कुंजीर, स्नेहल कुंजीर, नेहा बुराडे, अभिषेक सावंत, ईश्वर अय्यर आणि चार्मी दोशी, अशी मोठी टीम वननेससोबत काम करत आहे.