हाताची पाचही बोटे सारखी नसतात, असे म्हटले जाते. कल्याणमधील सोमण कुटुंब मात्र त्याला अपवाद ठरते. कारण घरातील बहुतेकजण संगीत कलेत पारंगत आहेत. कल्याणातील टिळक चौक परिसरात राहणाऱ्या सोमण कुटुंबापैकी पौर्णिमा सोमण यांना माहेरहून संगीताचा वारसा मिळाला आहे. अलिबागजवळील नागांव या त्यांच्या माहेरी  शास्त्रीय संगीताचे धडे गिरविले जात. शाळेत गीत गायन स्पर्धामध्ये त्या सहभाग घेत असत, मात्र लग्नापूर्वी त्यांनी शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेतले नव्हते. पुढे लग्नानंतर पती कै.प्रभाकर सोमण यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर शिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि अखेर कल्याण गायन समाज येथून संगीत विशारद पदवी त्यांनी संपादन केली. संगीत शिक्षण घेता घेता घरीच त्यांनी संगीताच्या शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. त्या काळी आजच्या इतकी पाळणाघर संस्कृती रुजली नव्हती. त्यामुळे मुलांचे संगोपन करण्यासाठी त्यांनी शासकीय नोकरी सोडली. त्यामुळे  घरच्या घरी संगीत प्रशिक्षणाचे वर्ग घेण्यास त्यांनी सुरुवात केली. १९८५ पासून आतापर्यंत त्यांचा हा उपक्रम सुरूच आहे. त्यामुळे संगीताचे सूर हे सोमण कुटुंबाचे अविभाज्य घटक आहेत.   
लहानपणीच कानावर संगीताचे स्वर पडल्याने पौर्णिमा सोमण यांचे सुपुत्र मंदार सोमण यांची पावले संगीत क्षेत्राकडे वळली. मुळात वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेले मंदार आपले पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करिता गायक म्हणून कार्यक्रम करायला लागले. कार्यक्रमांच्या माध्यमातून संगीत क्षेत्रातली रुची वाढत गेली व त्यांच्या मनात संगीत क्षेत्रात करिअर करण्याचा विचार आला. पुढे मंदार यांनी सुगम संगीताच्या शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. संगीत मैफलचे अभ्यासपूर्ण आयोजन, योग्य मांडणी आणि शिस्तबद्ध सादरीकरण हे मंदार सोमण यांचे वैशिष्टय़. आपल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या आवाजाचा पोत, क्षमता ओळखून त्यांच्याकडून गाणी बसवून घेणे व त्याचे उत्तमरीत्या सादरीकरण कसे होईल याकडे मंदार यांचे विशेष लक्ष असते. १५ वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत असणारे मंदार सोमण आज ‘संगीत मार्गदर्शक’ म्हणूनही ओळखले जातात. सोमण यांच्या ‘सामवेद संगीत क्लास’मध्ये वयाच्या सातव्या वर्षांपासून ते सत्तर वयापर्यंत विविध वयोगटातील, विविध कार्यक्षेत्रातील विद्यार्थी आहेत. मंदार सोमण यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून एज्युकेशन टूडे फाऊंडेशनतर्फे संगीत क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीकरिता तर जाएन्ट्स ग्रुप ऑफ कल्याणतर्फे देण्यात येणारा कल्याण मेट्रो भूषण पुरस्कार त्यांना मिळाला आहे. पौर्णिमा सोमण यांची कन्या सुकन्या जोशी (पूर्वीची ममता सोमण) यांनीही लहानपणी घरी संगीत माहोल पाहता संगीत क्षेत्रात रुची दाखवली. परंतु पुढे वक्तृत्व कौशल्याची आवड जोपासत आज त्या श्रीधर फडके यांच्या गीतरामायण कार्यक्रमात निवेदिका म्हणून आपला ठसा उमटवत आहेत.
मंदार सोमण यांच्या पत्नी स्वरदा सोमण यांनाही लहानपणापासूनच संगीतात आवड असल्यामुळे शालेय जीवनातच संगीत शिक्षण घेण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे साहजिकच संगीत क्षेत्रात पुढे जाऊन करिअर करायचे हे स्वरदा यांच्या मनात पक्के होते. मंदार यांच्याशी लग्न झाल्यानंतर संगीताचे उर्वरित शिक्षण घेण्यास त्यांनी सुरुवात केली व पुढे संगीत विशारद ही पदवी त्यांनी संपादित केली. या सगळ्या गोष्टी पौर्णिमा सोमण यांच्या सहकार्यामुळे, पुढाकारामुळेच होऊ शकल्या, असे स्वरदा सांगतात. स्वरदा या एक उत्तम गायिका म्हणून कार्यरत असून इनरव्हील क्लब ऑफ कल्याण यांच्यावतीने ‘आदर्श संगीत शिक्षिका’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.
सोमण कुटुंबाची तिसरी पिढी म्हणजे मंदार व स्वरदा सोमण यांचे चिरंजीव सुराज सोमण. सध्याच्या बाजारीकरणाच्या युगातही दहावीत शिकणाऱ्या सुराजला संगीत क्षेत्रातच करिअर करायचे आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. संगीतातील ‘ताला’च्या मोहामुळे मी वयाच्या आठव्या वर्षांपासून तबला वादनास सुरुवात केली, असे सुराज सांगतो. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात येणाऱ्या तबलावादनाच्या पाच परीक्षांपर्यंतचे शिक्षण सुराजचे झाले असून आंतर शालेय गीतगायन, तबलावादन स्पर्धामध्ये सुराज आवर्जून सहभाग नोंदवतो. २०१३-१४ मध्ये राजस्थान येथे पार पडलेल्या अणुव्रत गीत गायन स्पर्धेमध्ये तबला साथ-संगतीसाठी सुराजचा विशेष सहभाग होता.