राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असून अनेक ठिकाणी मतदारांनी पाठ फिरवलेली पहायला मिळत आहे. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. सर्वसामान्यांसह अनेक नेतेमंडळी आणि सेलिब्रेटी मतदानासाठी बाहेर पडले असून मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान बदलापूरमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतरही मुलांनी मतदान करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.
बदलापूरमधील वडवली गावातील म्हात्रे कुटुंबावर रविवारी रात्री आभाळ कोसळलं होतं. पांगळू झिपरु म्हात्रे यांचे रात्री ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या सात मुलांनी त्यांनी अग्नी दिला. सकाळी अस्थी गोळा करण्याचा विधी उरकल्यानंतर सातही मुलं मतदान केंद्रावर पोहोचली आणि मतदानाचा हक्क बजावला. म्हात्रे कुटुंबातील एकूण ५२ सदस्यांनी यावेळी मतदान केलं.
कुटुंबातील एखाद्या सदस्याचं निधन झाल्यानंतर घरात दुखवटा पाळला जातो. पण म्हात्रे कुटुंबाने मतदान केंद्र गाठत कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं आवाहनही केलं.
हात नसूनही शेतकऱ्याचं मतदान
बाजीराव मोजाड असं या शेतकऱ्याचं नाव आहे. नाशिकमधील देवळाली कॅम्प येथे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. २००८ रोजी शेतात काम करत असताना एका अपघातात त्यांनी आपले दोन्ही हात गमावले होते. आज एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना, बाजीराव मोजाड यांनी कोणतंही कारण न देता आपलं कर्तव्य पार पडलं.
