पीएफआय आणि चर्चमधून दबाब आल्याने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिल्याचा गौप्यस्फोट करत पावर हंग्री जिहादमधून महाविकास आघाडीचे गठन झाल्याचा गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोमवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना केले. आजही औरंगजेबाच्या थडग्यावर जाणाऱ्यांबरोबर उद्धव ठाकरे मैत्री करतात आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा काढणाऱ्या काँग्रेसबरोबर जवळीक ठेवतात, अशी टिकाही त्यांनी केली. चारही बाजूने पावर हंग्री जिहाद गंभीर वळणावर असल्याने सजग रहाण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा >>> आमच्या पदाधिकाऱ्यांनाही पोलीस संरक्षण द्या; ठाणे काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये सोमवारी सायंकाळी वंदे मातरम संघ, दीनदयाळ प्रेरणा केंद्राच्या वतीने ‘धर्मांतराचे वास्तव आणि समान नागरी कायदा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी माधव नानिवडेकर, भावा दाते, ॲड. अंजली हेळेकर, विशाली शेटे, ओ. श्रुती, सुदिप्तो सेन, संदीप लेले, सचिन केदारी, राम आपटे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये जनतेचे जनमत मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना त्यांचा वाटा वाढवून देण्याची भूमिका घेण्यात आली. त्याचवेळी आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचेही प्रयत्न सुरू होते पण, काँग्रेस शेवटपर्यंत समर्थनाचे पत्र देईल की नाही असे चित्र निर्माण झाले होते. त्यावेळेस अहमद पटेल आणि चर्च सक्रीय होते. जी माहिती समोर येते. त्यानुसार पीएफआय आणि चर्चमधून सोनिया गांधी यांच्यावर दबाव आला की, उद्याच्या व्यवस्थेसाठी आता उद्धव ठाकरे यांना समर्थन द्या. अन्यथा काँग्रेसचे समर्थनाचे पत्र उद्धव यांना जाण्याचा मुद्दाच काय?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा >>> ठाण्यात राष्ट्रवादीने साजरा केला ‘गद्दार दिन’; आनंद परांजपे यांची अटक व सुटका
जिहाद हा धर्मांतराच्या वास्तवबद्दल सिमित राहिलेला नाही. हा प्रश्न हिंदू आणि राष्ट्र अस्तित्वाच्या संबंधापर्यंत पोहोचला आहे. जे सत्य समोर येते आहे, त्याला खतपाणी घालण्यासाठी विरोधकांनी शेकडो वर्ष खर्ची घातली आहेत. यासाठी पोषक राजकीय व्यवस्था उभी केली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात या सगळ्याला भगदाड पाडण्याचे काम सुरू झाले आहे, असेही ते म्हणाले. लव, इलेक्ट्राॅनिक, सेवा आणि पावर अशा जिहादमध्ये चार गोष्टी आहेत. धर्मांतरणाचे वास्तव समजून घ्यायचे असेल तर या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. धर्मांतर नाही तर मतमतांतर आहे. धर्म वैश्विक आहे. चांगल वागल पाहिजे, दुसऱ्याचे पोट भरले पाहिजे, वरिष्ठांना आणि निसर्गाला नमस्कार केला पाहिजे अशी मूल्य धर्म सांगतो. पत्नी पतीशी करते तो धर्म, पती पत्नीशी करतो तो धर्म, राजा जनतेशी करतो तो राजधर्म असतो. धर्म, मूल्य वैश्विक आहे, असेही ते म्हणाले. संविधानामध्ये अगदी स्पष्ट लिहिले आहे. धर्मनिरपेक्ष नव्हे पंथ निरपेक्ष. सेक्युलॅरिझम म्हणजे पंथ निरपेक्ष. गल्लत यात होत आहे. त्यामुळे अज्ञानाचा फायदा घेणारी टोळकी निर्माण होतात, असेही ते म्हणाले.