लहान वयोगटातील बालकांचे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हिपॅटायटीस बी, हीब या पाच आजारांपासून प्रतिबंध करणारी ‘पेंटाव्हेलेन्ट’ ही लस कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालय तसेच अन्य तेरा नागरी आरोग्य केंद्रांमध्ये मोफत उपलब्ध करून दिली आहे. महापालिका रुग्णालयांमध्ये ही लस नियमित उपलब्ध असणार आहे, असे महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांनी सांगितले.
या लसीकरण मोहिमेचा महापौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर विक्रम तरे, गटनेते रमेश जाधव यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. बालकांमधील आजार रोखणे आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पेंटाव्हेलेन्ट लस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे अन्य लसीकरण मोहिमेबरोबर पेंटाव्हेलेन्ट ही नवीन लसही बालकांना नियमित लसीकरणाच्या काळात देण्यात येणार आहे. सर्व स्तरातील बालकांना या सुविधेचा लाभ घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे, असे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सांगितले. सर्व सरकारी, निम सरकारी, दवाखाने, नागरी आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.