पर्यावरणकार्यकर्ते सारंग यादवडकर यांचे मत
‘अनेकदा आपले घर समुद्रकाठी, तळ्याकाठी असावे या कल्पनेतून माणूस आपली मर्यादा ओलांडू लागला आहे. नदीपात्रात, कधी तळ्याचा काही भाग बुजवून, तर कधी खारफुटीची कत्तल करून तो आपली बांधकामे करतो. हे करत असताना निसर्ग नमवल्याचा त्याला आनंद वाटतो. मात्र निसर्ग त्याच्यापेक्षा किती तरी बलाढय़ आहे हे तो विसरून जातो. कधी एकदा २६ जुलै, केदारनाथची ढगफुटी किंवा अगदी अलीकडे कात्रज घाटात शिंदेवाडीत आलेला पाण्याचा लोट बघता बघता सर्व नेस्तनाबूत करतो,’ असे मत पर्यावरण कार्यकर्ते सारंग यादवडकर यांनी ठाण्यात व्यक्त केले.प्राचीन काळापासून मानवी संस्कृती पाण्याकाठी वाढली आणि फुलली. नद्या, तळी यांच्या काठावर मानवाने वस्ती केली. हीच सवय आजही टिकून आहे. फरक एवढाच की पूर्वी माणसे जलेस्रोतांचे पावित्र्य राखून होते. आज मात्र त्याचा सर्वनाश करू पाहत आहे, अशा शब्दांत त्यांनी चिंता व्यक्त केली.
ठाण्यातील फर्न संस्थेच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेच्या शेवटच्या सत्रात पुण्याचे सारंग यादवडकर यांनी उपस्थित ठाणेकरांना मार्गदर्शन केले. पेशाने वास्तुविशारद असलेल्या यादवडकर यांचा पर्यावरण ऱ्हासाविरोधात लढा उभारला असून त्याविषयी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जलस्रोतांचा होत असलेला ऱ्हास व त्यामुळे निर्माण होणारी भयावह स्थिती त्यांनी मांडले.
‘मुळा-मुठेच्या पत्रात होणारे बांधकाम, टाकला जाणारा डेब्रिज यामुळे नदीपात्र अरुंद होत आहे. थोडा जरी जास्त पाऊस झाला आणि खडकवासला धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडले तर पुण्यातील सर्व घरे जलमय होतील. असा प्रसंग येऊ नये म्हणून आम्ही लढा सुरू केला. संपूर्ण अभ्यास करून नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलसमोर आपले तांत्रिकरीत्या परिपूर्ण मुद्दे मांडले. ३ ते ४ जणांनी चालू केलेल्या या कार्यात नंतर बरीच मंडळी सामील झाली. ३ जानेवारी २०१३ला सुरू झालेल्या लढय़ाला १२ फेब्रुवारी २०१५ला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सफल पूर्णविराम मिळाला. नदीपात्रातून जाणाऱ्या अनधिकृत रस्त्याचे काम थांबले. हे काम सोपे नव्हते, त्याला प्रचंड जिद्द आणि चिकाटीची गरज होती,’ अशा शब्दांत यादवडकर यांनी आपला अनुभव कथन केला.
‘या संपूर्ण चळवळीदरम्यान सतत सकारात्मक भूमिका ठेवणे आवश्यक होते. भ्रष्टाचार आहे, नियमांचे उल्लंघन सतत होत आहे, मात्र सामान्य माणसाचा आवाज हा सर्वात प्रभावी आहे. त्यामुळे नागरिकांनी जागरूक होणे आवश्यक आहे,’ असे आवाहन त्यांनी केले.
‘शहरवासियांनी संयम पाळावा’
पृथ्वीवरील केवळ १% पाणी माणसाला उपलब्ध आहे. त्यातले बरचसे पाणी भूमिगत आहे. उरलेल्या पाण्याचा बेसुमार वापर माणसे करतात. विशेषत: शहरी माणसे स्वत:च्या विलासासाठी गरजेपेक्षा जास्त पाणी वापरतात. त्यांनी थोडा संयम पाळला तर तहानलेल्या शिवारांना, गावांना पाणी मिळू शकेल. त्याच बरोबर प्लॅस्टिकचा वापर, अस्वच्छता यामुळे गटारे तुंबतात आणि थोडय़ाशा पावसात परिसर जलमय होतो, असे यादवडकर म्हणाले.
