‘मन, बुद्धी आणि शरीर जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच खरी साधना होते’, असे प्रतिपादन ज्येष्ठ तबलावादक सुधाकर पैठणकर यांनी केले. काका गोळे फाउंडेशन आयोजित ‘प्रतिभावंत बदलापूरकर’ या उपक्रमातील मुलाखतीप्रसंगी ते बोलत होते.
या मुलाखत मालिकेतील अकरावी मुलाखत नुकतीच पार पडली. या प्रसंगी श्रीराम केळकर यांनी ज्येष्ठ तबलावादक सुधाकर पैठणकर आणि त्यांचे सुपुत्र सौरभ पैठणकर यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. आपल्या तबलावादनाच्या कारकीर्दीवर बोलत असताना रियाज आणि साधना यांच्यातील फरक त्यांनी अत्यंत मार्मिकपणे प्रेक्षकांसमोर उलगडला. माझ्या वादनात केतकर मास्तर आणि नारायण जोशी यांच्या भेटींचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्यामुळे वादनाकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली. यांच्या मार्गदर्शनामुळेच तबलावादनाच्या क्षेत्राचा मला आनंद घेता आला, असेही सुधाकर पैठणकरांनी या वेळी सांगितले. उस्ताद अहमदजान थिरकवाँ यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या आठवणी सांगत असताना पैठणकर भूतकाळात गेले.
वडिलांकडून मिळालेला तबलावादनाचा वारसा आपण कसा जपला, तो कसा वाढवला याबद्दल सांगताना त्यातल्या खाचाखोचाही त्यांनी उलगडल्या. तबल्याचा उगम, तबलावादनातील घराणी, वादनशैलीच्या निरनिराळ्या पद्धती आणि विभिन्न गायन प्रकारासाठी लागणारी तबल्याची साथ याविषयी पैठणकरांनी सोदाहरण विशद केले. तबलावादन करत असताना लागणारी वादनातील शुद्धता, बारकावे आणि अचूकता वडिलांकडून बालपणीच मिळाल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.तबलावादनातील बारकावे, त्यातील प्रकार आणि घराणी याविषयी ऐकताना रसिक वेगळ्याच विश्वात गेले होते. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर पोहोचला. या वेळी पैठणकर पितापुत्रांना केदार खानोलकर यांनी संवादिनीवर तर गायनात पैठणकरांच्याच सुकन्या मनीषा साने यांनी साथ दिली. सांगता सुधाकर पैठणकर आणि सौरभ पैठणकर या पिता-पुत्रांच्या द्रुतलयीतील वादनाने झाली.