scorecardresearch

Premium

सेकंड इनिंग : कचरा व्यवस्थापनाचा ‘दूत’

श्रीकृष्ण भागवत १९७२ मध्ये बृहन्मुंबई महापालिकेत ‘कनिष्ठ अभियंता’ म्हणून नोकरीला लागले.

सेकंड इनिंग : कचरा व्यवस्थापनाचा ‘दूत’

आपले स्वत:चे घर स्वच्छ आणि टापटीप ठेवणारा हा सर्वसामान्य माणूस सार्वजनिकस्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन किंवा त्याच्या विल्हेवाटीबाबत जागरूक असतो का? काही सन्माननीय अपवाद वगळले तर याचे उत्तर नाही असेच आहे. घनकचऱ्याबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी, त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी आणि त्यापासून बायोगॅस व वीजनिर्मितीसारखे प्रकल्प राबविण्यासाठी डोंबिवलीतील ७२ वर्षीय श्रीकृष्ण भागवत हे ‘तरुण’ निवृत्तीनंतर गेली १४ वर्षे जिवाचे रान करत आहेत. त्यांच्या या पर्यावरणस्नेही कार्याविषयी..

श्रीकृष्ण भागवत १९७२ मध्ये बृहन्मुंबई महापालिकेत ‘कनिष्ठ अभियंता’ म्हणून नोकरीला लागले. बृहन्मुंबई महापालिकेतील ३० वर्षांच्या सेवेत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात त्यांनी अनेक वर्षे काम केले. येथे काम करत असतानाच घनकचरा व्यवस्थापन, त्याची विल्हेवाट, क्षेपणभूमीची समस्या हे सर्व भविष्यातील गंभीर प्रश्न होणार असल्याचे तेव्हाच त्यांच्या लक्षात आले आणि भागवत यांनी हा विषय आपल्या ध्यासाचा व अभ्यासाचा केला. घनकचरा व्यवस्थापन विभागात त्यांची ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ म्हणून नेमणूक करण्यात आली.
महापालिकेतील नोकरीच्या कार्यकाळात भागवत यांनी ‘प्रगत परिसर व्यवस्थापन’ (एएलएम) ही संकल्पना राबविली. कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत नागरिकांच्या महापालिकेकडून काही अपेक्षा असतील तर जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी सक्रिय सहभागी व्हावे, हे त्यांनी लोकांना पटवून दिले. घाटकोपर येथे जोशी लेनमध्ये काम सुरू केले. स्थानिक लोकांशी बोलून, त्यांच्याशी चर्चा करून त्यांना या कामात प्रत्यक्ष सहभागी करून घेतले. ओला आणि सुका कचरा घरातच वेगवेगळा झाला पाहिजे यासाठी १९९६-१९९७ मध्ये त्यांनी आग्रह धरला. ओला कचरा खतासाठी आणि कोरडा कचरा पुनप्र्रक्रियेसाठी पाठविण्यात येऊ लागला. झाडांचा पालापाचोळा, भाजीपाला, उरलेले अन्न यातून गांडुळ खत प्रकल्पही काही भागांत सुरू केले. यामुळे कचरा वाहून नेण्याचा भार काही प्रमाणात कमी झाला. नोकरीच्या कार्यकाळात भागवत यांनी मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे ७५० लेनमध्ये स्थानिक नागरिकांच्या सहभागाने ‘प्रगत परिसर उपक्रम’ यशस्वीपणे राबविला.
३० सप्टेंबर २००२ मध्ये भागवत बृहन्मुंबई महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर एक वर्षांसाठी महापालिका प्रशासनाने त्यांना सेवेत ठेवून घेतले. २००३ ते २००७ या कालावधीसाठी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था येथे सल्लागार म्हणूनही काम केले. निवृत्तीनंतर त्यांनी हा विषय समाजापर्यंत अधिक नेटाने पोहोचविण्याचा घेतला. विविध ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी चर्चा, व्याख्याने देणे असे काम भागवत यांनी सुरू केले. महाराष्ट्राबाहेर हैदराबाद, भोपाळ, चेन्नई ते अगदी श्रीलंकेपर्यंत ते फिरले. रोटरी क्लब आणि अन्य संस्था, महिला मंडळे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, शाळेतील विद्यार्थी, सहकारी गृहनिर्माण संस्था या सगळ्यांपर्यंत व्याख्यांनाच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन हा विषय ते सातत्याने पोहोचवीत असतात. महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये भागवत यांनी आत्तापर्यंत साडेसात हजार व्याख्याने दिली आहेत. २००४ पासून कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी ते मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. या कामाचे त्यांना कधी मानधन मिळते तर कधी मिळत नाही, पण तरीही त्यांचे काम आजही तळमळीने सुरू आहे. पर्यावरण दक्षता मंच या संघटनेच्या सहकार्याने त्यांनी डोंबिवली परिसरात ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर करणाऱ्या सुमारे ८१ ‘जादूई बादल्या’ काही ठिकाणी पुरविल्या आहेत. डोंबिवलीत दत्तनगर परिसरात उत्कर्ष महिला मंडळाच्या सहकार्याने ‘प्रगत परिसर व्यवस्थापन’ संकल्पना राबविली आहे. डोंबिवली ‘एमआयडीसी’ विभागातील सेंट जॉन हायस्कूल येथे निर्माल्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे.
भागवत यांनी सुचविल्यानुसार दीर्घ कालावधीनंतर मुंबईत भाभा अणुसंशोधन केंद्रातील डॉ. शरद काळे यांनी विकसित केलेला ‘निसर्गऋण’ हा प्रकल्प तेथे उभारण्यात आला आहे. येथे उभारण्यात आलेल्या भट्टीतून दोन टन कचऱ्यापासून सुमारे दहा किलोव्ॉट वीज तयार केली जात आहे. त्याचा वापर क्षेपणभूमीवर पथप्रदर्शक (रात्रीच्या वेळी दिवे) म्हणून केला जात आहे. या प्रकल्पातून ४०० किलो खतही मिळत आहे. भागवत यांनी त्यांच्या डोंबिवलीतील बंगल्याच्या आवारात २००४ मध्ये बायोगॅस सयंत्र बसविले आहे. सध्या या सयंत्रात दोन किलो ओल्या कचऱ्यापासून २० मिनिटे पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस तयार होत आहे. एक वेळचा आमटी-भाताचा कुकर या गॅसवर होतो तसेच बटाटेही व्यवस्थित उकडले जातात. त्यांनी बंगल्याच्या आवारात गांडुळ खत प्रकल्पही तयार केला आहे. झाडांचा पालापाचोळा, निर्माल्य यातून काही प्रमाणात खत तयार केले जाते.
नागरिकांनीही सक्रिय सहभाग दिला तर घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट ही समस्याच राहणार नाही तसेच क्षेपणभूमीचीही आवश्यकता राहणार नाही असे भागवत यांचे सांगणे आहे. प्लास्टिकचा वापर आज अनिर्बद्ध प्रमाणात वाढला असून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी त्या त्या परिसरात, गावागावांमध्ये कारखाने मोठय़ा संख्येत उभे राहिले पाहिजेत. पाणी, शीतपेये आणि तेल तयार करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या प्लास्टिकच्या बाटल्या त्यांच्याकडेच परत पाठविण्याची व्यवस्था केली पाहिजे. यासाठी नवी बाटली घेताना जुनी बाटली त्यांना परत करण्याची पद्धत सुरू करावी आणि त्या कंपन्याना या प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्याचे बंधनकारक करावे, अशी सूचनाही भागवत यांनी केली. घराघरामध्येच ओला आणि सुका कचरा वेगळा केला जावा याबाबत भागवत आग्रही आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थांनी याबाबत पुढाकार घ्यावा आणि संस्थेच्या आवारातच ओल्या कचऱ्यापासून स्वयंपाक गॅसनिर्मिती, वीजनिर्मिती, गांडुळ खत प्रकल्प सुरू करावेत. सोसायटीच्या पॅसेजमधील दिवे, आवारातील दिवे यावर चालू शकतील. स्मशानभूमीतही ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारला येऊ शकेल, असे त्यांचे आग्रहाचे सांगणे आहे. शैलेश व ऋषिकेश ही दोन मुले, सुना आणि नातवंडे यांचा या कामाला नैतिक पाठिंबा असल्याचेही भागवत आवर्जून सांगतात. भागवत यांच्या कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांचा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्चर बृहन्मुंबई, रचना संसद इन्स्टिटय़ूट एन्व्हॉरन्मेंट आर्किटेक्चर मुंबई आणि अमेरिकन दूतावासातर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. बृहन्मुंबई महापालिकेचा महापौर वैयक्तिक चषक व सुवर्णपदकही त्यांना मिळाले आहे. माथेरान नगरपालिका, राजस्थान शासनातर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
श्रीकृष्ण भागवत यांचा संपर्क क्रमांक९२२३५००८८३

prabhakar devdhar
इलेक्ट्रॉनिक आयोगाचे माजी अध्यक्ष देवधर यांचे निधन; ‘अ‍ॅप्लॅब इंडिया’चे संस्थापकप्रवर्तक
Elderly activist commits suicide in CPI(M) office in Solapur
सोलापुरात माकप कार्यालयात वृध्द कार्यकर्त्याची आत्महत्या
ration distribution mediator beaten Kalyan
कल्याणमध्ये शिधावाटप मध्यस्थाला लोखंडी सळईने मारहाण
Wipro founder Azim Premji
विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजींचं मुलांना कोट्यवधींचं गिफ्ट; नावावर केले ५०० कोटींचे शेअर्स!

१) श्रीकृष्ण भागवत यांनी बंगल्याच्या आवारात उभारलेले बायोगॅस सयंत्र
२) बायोगॅसपासून तयार झालेला स्वयंपाकाचा गॅस

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sri krishna bhagwat life after retirement

First published on: 06-05-2016 at 03:46 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×