निसर्गरम्य परिसरात वसलेल्या मूळगावमधील ‘संत मेरी मॅग्दलेन चर्च’ म्हणजे स्थापत्यसौंदर्याचा उत्तम नमुना. आसपास हिरवाई आणि समोर ऐसपैस पटांगण असलेले हे एक दिमाखदार चर्च आहे. हे चर्च पूर्वी पाली येथील ‘देव माता चर्च’चा भाग होते. मूळगावच्या लोकांना त्यांच्या धार्मिक गरजा भागविण्यासाठी तीन किलोमीटर पायपीट करावी लागत असे. त्याकाळी वाहतुकीच्या सुविधा नव्हत्या. पावसाळ्यात खूप अडचणी येत होत्या. हे सर्व लक्षात घेऊन सुमारे ७१ वर्षांपूर्वी मूळगावसाठी स्वतंत्र चर्च असावे, असा विचार पुढे आला. पाली चर्चचे तत्कालीन धर्मगुरू फादर जे. एस. मिरांडा आणि फादर रेमंड मेंडिस यांनी याकामी पुढाकार घेतला. २२ जुलै रोजी या चर्चमध्ये संत मेरी मग्दालेना यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. १९४५ मध्ये मूळगाव येथे सुरुवातीला लहानसे चर्च बांधण्यात आले. त्यानंतर १९६६ साली नवीन चर्च बांधण्यात आले.

मूळगाव चर्चचे प्रथम प्रमुख धर्मगुरू फा. आयरेस फर्नाडिस होते. त्यानंतर फा. क्लेमेंट डिसा यांनी १९५६ ते १९६७ अशी तब्ब्ल ११ वर्षे मूळगावची आध्यत्मिक सेवा केली. त्यांच्या कठोर मेहनतीने मूळगाव येथे प्राथमिक शाळा उभी केली. कोणत्याही चर्चचा आशीर्वाद विधी होत असताना ते चर्च एखाद्या संतांच्या नावाने समर्पित केले जाते, त्यामुळे मूळगाव हे चर्च ‘संत मेरी मॅग्दलेन’ या नावाने ओळखले जाते. या संतांच्या नावाने समर्पित केलेले वसईमध्ये हे एकमेव चर्च आहे. सध्या उभ्या असलेल्या या चर्चला ५० वर्षे पूर्ण होत असून या वर्षी पोप फ्रान्सिस यांनी ३ जून २०१६ रोजी संत मेरी  मॅग्दलेन यांचा ‘प्रेषितांची प्रेषिता’ असा गौरव करून तिच्या स्मृतिदिनाला सणाचा दर्जा दिला.

चर्चचे कामकाज

फा. फिलिप घोन्साल्विस हे मूळगाव चर्चचे सध्याचे प्रमुख धर्मगुरू असून फा. लिओ फरगोस हे साहाय्यक धर्मगुरू आहेत. या चर्चअंतर्गत १७ गाव परिवार असून ५७७ कुटुंबे प्रार्थनेसाठी येतात. प्रत्येक रविवारी न चुकता चर्चमध्ये जमतात. दिवसभर मिस्सा चालते. तर दर बुधवारी नोव्हेना असते. ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, महिला, बालसंघ, शिक्षक संघटना अशा १७ संघटना चर्चमध्ये विविध पातळीवर कार्य करतात. लग्नसोहळे, बाप्तिस्मा, प्रथम ख्रिस्त शरीर, मृत्यू इत्यादी विधी चर्चमध्ये साजरे केले जातात, तसेच विविध सामाजिक विषयावर प्रबोधन केले जाते. गुडफ्रायडे आणि नाताळ या सणांना एकाच वेळी दोन हजार लोक प्रार्थनेसाठी येतात. चर्चचा आतील भाग प्रशस्त आणि सुंदर आहे. मूळगाव चर्चचा सण दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो. यंदा हा सण १३ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. यावेळी पवित्र मिस्सा साजरा केला जातो. या दिवशीनातेवाईक, माहेरवाशिणी मोठय़ा संख्येने प्रार्थनेसाठी जमतात आणि संध्याकाळी करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी होतात.

संत मेरी मॅग्दलेन कोण होत्या?

संत मेरी  मॅग्दलेन या येशूच्या सहकाऱ्यांपैकी एक होत्या. येशूच्या सामाजिक कार्यात त्याला सहकार्य करणाऱ्या मोजक्याच स्त्रियांपैकी त्या एक होत्या. येशूच्या मृत्यूनंतर त्यांचे शिष्य भयभीत झाले आणि त्यांची पांगापांग झाली. मात्र मेरी मॅग्दलेन या येशूच्या कबरीजवळ येऊन प्रार्थना करत होत्या. येशूच्या पुनरुत्थानानंतर त्याने पहिले दर्शन मरिया यांनाच दिले, असे बोलले जाते. त्यानंतर ही बातमी माझ्या इतर बांधवांना जाऊन सांग, असा संदेश येशूने दिला आणि येशूच्या पुनरुत्थानाची ती पहिली साक्षीदार बनली. म्हणून तिला ‘प्रेषितांचे प्रेषिता’ ही पदवी बहाल करण्यात आली.