निवडणूक प्रचारासाठी मैदानांचे मात्र समसमान वाटप
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये तुंबळ लढाई रंगली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह काँग्रेस आघाडी स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ चार दिवस शिल्लक राहिल्याने दिग्गज नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत तळ ठोकला आहे. मोठय़ा नेत्यांच्या चौक तसेच जाहीर सभांची आखणी करण्यात आली असून नागरिकांची गर्दी खेचण्यासाठी सर्वच पक्ष वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहेत. यंदाच्या निवडणुकीत मोक्याची मैदाने ताब्यात राहावीत यासाठी सर्वच पक्षांमध्ये सुरुवातीला चुरस बघायला मिळत होती खरी, मात्र प्रत्यक्षात मैदान वाटपात यंदा महापालिकेने सर्वपक्षीयांना समान न्याय दिल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. विशेष म्हणजे, मैदानांऐवजी मोक्याच्या चौकातील सभा हे यंदाच्या निवडणुकीचे आकर्षण ठरले आहे.
आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सभेसाठी डीएनसी मैदान, भागशाळा मैदान, क्रीडासंकुल, यशवंतराव चव्हाण मैदान, वासुदेव बळवंत फडके मैदान आदी आरक्षित करण्याची स्पर्धा रंगली होती. महापालिका हद्दीत भाजपचे तीन आमदार आहेत तर महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे मैदानांच्या आरक्षणात या दोन पक्षांचा वरचष्मा असेल असे चित्र सुरुवातीला रंगविण्यात आले होते. मात्र, महापालिका आयुक्त ई.रवींद्रन यांनी याविषयी स्पष्ट भूमिका घेतल्याने मैदानांचे वाटप सर्वच पक्षांना समान पद्धतीने झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, यंदा मैदानांऐवजी चौक सभांवर प्रत्येक पक्षाने जोर दिल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून येत आहे. लोकांची उदासीनता पाहता सभांना गर्दी जमविणे हे मोठे आव्हान पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर असते. यामुळे यंदा मोठय़ा मैदानांऐवजी छोटय़ा मैदानांची निवड पक्षांनी केली आहे. निवडणुकीच्या काळात गाजणारे डीएनसी मैदान, क्रीडासंकुल, जिमखाना ही मैदाने यंदाच्या निवडणुकीत ओस पडली आहेत. तर अप्पा दातार चौक, भागशाळा मैदान व यशवंतराव चव्हाण, फडके मैदानास यंदा सुगीचे दिवस आले आहेत. आघाडीने गावदेवी मैदान येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची तर आयरे गावात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभा आयोजित केली आहे. मनसेने राज ठाकरे यांच्या कल्याण पूर्व पश्चिम व डोंबिवली पूर्व पश्चिम मध्ये सभांचे आयोजन केले आहे.

प्रचारात गावांचा विसर
निवडणूकीच्या तोंडावर ग्रामीण भागाचा मुद्दा चांगलाच गाजला. परंतु प्रचारात मात्र सर्वपक्षीयांना गावांचा विसर पडलेला दिसला. शिवसेनेने येथे चौक सभांवर भर देऊन नेत्यांना मैदानात उतरविले असले तरी या ठिकाणी मोठी सभा घेण्याचे मात्र टाळले आहे. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रीमिअर कॉलनी मैदानात जाहीर सभा घेतली. त्यानंतर या पक्षाचा कोणताही बडा नेता येथे फिरकलेला नाही.