महापौर क्रीडा स्पर्धाच्या चौकशीला सुरुवात; पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेल्या चार वर्षांत घेण्यात आलेल्या विविध प्रकारच्या महापौर क्रीडा स्पर्धावर महापालिका प्रशासनाने सुमारे १ कोटी ७५ लाखांहून अधिक रक्कम खर्च केली आहे. या स्पर्धाच्या नावाखाली क्रीडा विभागाकडून मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात असताना यासंबंधीची चौकशी सुरू झाली असल्याने बडय़ा पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
या स्पर्धासंबंधी करण्यात आलेल्या तक्रारींची दखल प्रशासनाने घेतली आहे. महापौर क्रीडा स्पर्धाच्या नावाखाली आगाऊ रकमा उचलून त्यांच्या पावत्या तयार करायच्या आणि क्रीडा स्पर्धा खर्चाचा प्रस्ताव तयार करून तो मंजूर करून घ्यायचा, अशी पद्धत क्रीडा विभागाने गेल्या तीन ते चार वर्षांत अवलंबली. यामुळे क्रीडा स्पर्धाच्या आयोजनात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असण्याचा संशय उच्चपदस्थ पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या चार वर्षांत महापालिकेने महापौरांच्या नावाने घेतलेल्या क्रीडा स्पर्धा आणि त्यावर झालेल्या खर्चाच्या नस्ती तपासणीसाठी बाहेर काढल्या आहेत. या नस्ती पाहून उच्चपदस्थ अधिकारी अवाक झाले आहेत. पालिकेतील एक माजी पदाधिकारी पदावर असेपर्यंत महापौर क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहार, चौकशी बाहेर येऊ नये म्हणून प्रयत्नशील होता. या पदाधिकाऱ्याचा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे प्रशासनाने महापौर क्रीडा स्पर्धा खर्चासंबंधी आलेल्या तक्रारी आणि त्या अनुषंगाने क्रीडा स्पर्धावर झालेल्या खर्चाच्या नस्ती तपासण्यास सुरुवात केली आहे.
क्रीडा स्पर्धाच्या नस्तींमधील प्राथमिक चौकशीतून ही माहिती पुढे येत आहे. सर्व नस्ती तपासल्या तर मोठा क्रीडा घोटाळा उघड होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. महापौर क्रीडा स्पर्धेतील घोटाळ्याची शासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. दक्ष नागरिक मनोज कुलकर्णी यांनी क्रीडा अधिकारी राजेश भगत यांना निलंबित करण्याची मागणी यापूर्वी केली आहे.
पहिली खर्चाची पावती..
महापौरांच्या नावाने कोणतीही क्रीडा स्पर्धा असली की पहिली खर्चाची पावती तयार करून पालिकेच्या तिजोरीतून रक्कम काढली जात होती. ही रक्कम वसूल केली की मग ज्या भागात महापौर क्रीडा स्पर्धा आहे त्या भागातील ठेकेदार, बडा विकासक याला पकडून त्याच्याकडून स्पर्धेचा खर्च करून घेण्यात येत असे. बहुतांशी खर्च या ठेकेदार, विकासकांकडून करवून घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.
