अंबरनाथच्या सुजाता कोंडिकिरेची बँकेच्या अधिकारीपदी झेप
आजच्या स्पर्धेच्या युगात थोडेसे अपयश आले की मुले निराश होतात. मात्र अपघाताने नशिबी आलेल्या अंधत्वावर आणि गरिबीवर मात करत तब्बल २६ स्पर्धा परीक्षा देत अंबरनाथ येथील सुजाता कोंडिकिरे या तरुणीने जिद्दीने शोधलेली स्वत:च्या उत्कर्षांची प्रकाशवाट थक्क करणारी आहे. तिची स्टेट बँक ऑफ म्हैसूरच्या डोंबिवली शाखेत अधिकारीपदी निवड झाली आहे.
अंबरनाथच्या खुंटवली विभागात राहणारी सुजाता ही घरातील मोठी मुलगी. वडिलांच्या अल्प वेतनाच्या खाजगी नोकरीमुळे घरात जमाखर्चाची तोंडमिळवणी करताना होणाऱ्या कसरतीचा अनुभव ती लहानपणापासूनच घेत होती. त्यामुळे लवकरात लवकर शिकून नोकरी मिळवावी हेच सुजाताच्या जीवनाचे ध्येय होते. त्यासाठी अकरावीला ती सांगलीमध्ये वसतिगृहात राहून शिकत होती. मात्र दुर्दैवाने तिथे झाडावर डोके आपटल्याने तिची दृष्टी अधू झाली. मात्र त्या वेळी केलेल्या उपचारानंतर तिला पुन्हा दिसू लागले. पुढे पदवी शिक्षण पूर्ण करून तिने अंबरनाथमध्ये एका खाजगी कंपनीत नोकरी पत्करली. मात्र अशा प्रकारे सर्व कुटुंबाची जबाबदारी असणाऱ्या सुजाताच्या नशिबी अचानकपणे पुन्हा अंधारयुग आले. तिचा दृष्टिदोष बळावला. वयाच्या २६ व्या वर्षी हळूहळू दृष्टी अधू होऊन २७ व्या वर्षी तिच्या पदरी पूर्ण अंधत्व आले. त्यामुळे तिची नोकरी सुटली. तिला जबरदस्त मानसिक धक्का बसल्याने निराश झाली. दोन वर्षांहून अधिक काळ ती अंधार आणि निराशेच्या गर्तेत होती. त्यानंतर मात्र तिच्या मनातील जिद्दीने पुन्हा उचल खाल्ली. बदलापूर येथील अंध शाळेला तिने भेट दिली. अंधांसाठी खास विकसित करण्यात आलेल्या जॉर्ज सॉफ्टवेअरचा वापर करून तिने ‘एमएससीआयटी’ केले. वरळीतील ‘नॅब’मधून ब्रेल लिपीचे शिक्षण घेतले. शिबिरातून व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे गिरवले. साडेतीन वर्षांत तिने विविध बँकांच्या तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तब्बल २६ परीक्षा दिल्या. अखेर दोन महिन्यांपूर्वी तिच्या प्रयत्नांना यश आले. ऑगस्ट महिन्यात स्टेट बँक ऑफ म्हैसूरच्या डोंबिवली शाखेत तिची स्केल वन प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेंदूतून पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्याने मला दिसू शकत नसले तरी माझे डोळे चांगले आहेत. त्यांचा अन्य कुणाला तरी निश्चितच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे मी नेत्रदान करणार आहे.
– सुजाता कोंडिकिरे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State bank of mysore appointed sujata klondike as chairman
First published on: 21-10-2015 at 02:55 IST