कल्याण – आरोग्य विभागातील २०० हून अधिक सफाई कामगार रस्त्यावर झाडू मारण्यापेक्षा पालिका मुख्यालय, प्रभाग क्षेत्रांमध्ये अधिकाऱ्यांच्या दालनात वर्षानुवर्ष शिपाई म्हणून काम करत होते. काहीजण फेरीवाला हटाव पथकात वर्षानुवर्ष कार्यरत आहेत. सफाई कामासाठी कामगार उपलब्ध होत नसल्याने अशा सफाई कामगारांना मूळ विभागात हजर होण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. सफाई कामगार मूळ विभागात हजर झाल्यानंतर प्रभागस्तरावर साहाय्यक आयुक्तांशी संधान साधून ‘सोयीचे’ काम सुरू करत आहेत. अशा सफाई कामगारांना घनकचरा उपायुक्तांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

घनकचरा उपायुक्त अतुल पाटील यांना अंधारात ठेऊन प्रभाग स्तरावर साहाय्यक आयुक्तांकडून सोयीचा आदेश काढून सुखासिन काम करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सफाई कामगाराला उपायुक्त पाटील यांनी तंबी देऊन संबंधित साहाय्यक आयुक्ताला नोटीस काढली आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत काँक्रीट रस्त्यासाठी नांदिवली टेकडीचा चढ-उतार काढण्यास भूमाफियाचा विरोध

ठाणमांडे हटविले

कल्याण, डोंबिवली शहरे स्वच्छता उपक्रमात अग्रभागी असावीत म्हणून घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनावरून स्वच्छतेचे विविध उपक्रम शहरात राबवित आहेत. स्वच्छता अभियानात पालिकेला शासनस्तरावर मानांकने मिळत आहेत. स्वच्छतेसाठी पुरेसे सफाई कामगार रस्त्यावर असावेत म्हणून अनेक वर्षे विविध विभागात शिपाई, फेरीवाला हटाव पथक, बाजार शुल्क वसुली, कर वसुली विभागात शिपाई म्हणून अनेक सफाई कामगार कार्यरत आहेत. काही नगरसेवकांच्या घरी, कार्यालयात शिपायासारखी कामे करतात.
पालिका मुख्यालय, प्रभागातील असे २०० ते ३०० कामगार एकावेळी सफाईसाठी उपलब्ध झाले तर प्रभागांमधील स्वच्छतेला वेग येईल म्हणून उपायुक्त पाटील यांनी आयुक्तांना विविध विभागातील सफाई कामगार मूळ घनकचरा विभागात हजर होण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली.

आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून असे कामगार घनकचरा विभागात हजर होण्याचे आदेश काढले. दोन महिन्यांपूर्वी १४२ कामगार, टप्प्याने फेरीवाला हटवा पथकातील कामगार सफाई विभागात हजर झाले. उपायुक्त पाटील यांनी काही कामगारांची वेगवेगळ्या प्रभागात बदली केले. काहींना आहे त्या प्रभागात हजेरी निवाऱ्यावर कर्तव्यावर लावले. ऐषआरामाची सवय लागलेल्या, फेरीवाला पथकात राहून फेरीवाल्यांकडून मलिदा घेण्याची सवय लागलेल्या कामगारांना प्रभागांमध्ये नवीन काम जमेनासे झाले आहे. हे कामगार प्रभागातील साहाय्यक आयुक्तांशी संधान साधून घनकचरा उपायुक्तांना अंधारात ठेऊन कष्टाची कामे करण्याऐवजी आरामाची कार्यालयातील कामे मिळतील यासाठी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा – शिंदे सेनेचे पुन्हा ‘मिशन कळवा’, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश

स्थानिक पातळीवर कामगार सोयीच्या ठिकाणी काम करत असल्याचे निदर्शनास आल्यावर उपायुक्त पाटील यांनी संबंधिताला तंबी दिली आहे.
कल्याणमध्ये क प्रभागातील फेरीवाला हटाव पथकात तीन कामगार, ब प्रभागात बाजार शुल्क विभागातील एक कामगार, ग प्रभागात साहाय्यक आयुक्तांचा शिपाई, फ प्रभागात दोन कामगार, ह प्रभागात दोन, एक कंत्राटी कामगार मनमानीने काम करत असल्याच्या तक्रारी आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सफाई कामगारांनी त्यांनी दिलेले काम प्रभाग स्तरावर बदलून घेतले तर त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी केली आहे. सोयीचे काम घेतल्याची तक्रार प्राप्त झाली तर संबंधित कामगारावर कारवाईचा बडगा उचलला जाईल.” असे घनकचा, उपायुक्त अतुल पाटील म्हणाले.