डोंबिवली : नवीन मोटार वाहन नियमांची माहिती देण्यासाठी गुरुवारी जनजागृती कार्यक्रम राबविल्यानंतर डोंबिवली वाहतूक विभागाने शुक्रवारपासून बेशिस्त वागणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. नव्या नियमाप्रमाणे दंड वसुली करून शिस्तीने वाहने चालविण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांकडून केल्या जात आहेत. तसेच गणवेशात नसलेल्या, रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना नवीन मोटार वाहन कायद्यातील दंड रकमेप्रमाणे दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळपासून ही कारवाई तीव्र करण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या या आक्रमक कारवाईमुळे इतर रिक्षा, वाहनचालक धास्तावले आहेत. डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
रिक्षाचालकांनी रेल्वे स्थानक परिसरात वाहनतळावरच उभे राहून प्रवासी वाहतूक करावी. गणवेश घालून रिक्षेत बसावे. रिक्षेची कागदपत्र सोबत ठेवावी, असे आवाहन गित्ते यांनी केले आहे. रिक्षा संघटनांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे. प्रामाणिकपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना यामध्ये न्याय मिळेल, असे रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.