डोंबिवली- एका मोटार कार चालकाने रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून पुढून-मागून कोणी येत आहे का, याची पाहणी न करता अचानक जोराने दरवाजा उघडला. त्याचवेळी मोटारीच्या पाठीमागून सायकल वरून येत असलेल्या विद्यार्थिनीला दरवाजाचा जोरदार फटका बसल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.

कल्याण-बदलापूर रस्त्यावरील खोणी पलावा टप्पा दोन येथील वेटलेंट पार्कच्या समोरील भागात हा अपघात घडला आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी तक्रार केली. पोलिसांनी मोटार कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी सांगितले, तक्रारदार अजयकुमार जंगबहादुर सिंह (३६) हे चालक आहेत. ते खोणी पलावा दोन येथील डाऊन टाऊन कासारबानो येथे कुटुंबासह राहतात. अजयकुमार यांची मुलगी खासगी शिकवणीवरून सायकलवरून संध्याकाळच्या वेळेत घरी येत होती. तिचा हा नेहमीचा मार्ग आहे.

डाऊन टाऊन पलावा दोन येथून सायकलवरून येत असताना तेथे रस्त्याच्या बाजुला चयन भट्टाचार्य (रा. इपीक ओरिलिया, पलावा, खोणी) हे आपली मोटार घेऊन उभे होते. मोटार उभी असल्याने आर्या सिंह तेथून जात होती. मोटारी जवळून जात असताना अचानक मोटार वाहन मालक चयन भट्टाचार्य यांनी मोटीराचा पुढील दरवाजा मागे-पुढे न पाहता जोराने उघडला, त्याचा जोरदार फटका आर्याच्या सायकलीला बसला. आर्या सायकलसह रस्त्यावर पडली. बेसावधपणे पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

चयन यांनी निष्काळजीपणा केल्याने हा अपघात घडला आहे. पोलिसांनी आर्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून चयन यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.