हेल्मेटला प्राधान्य देणे गरजेचे
आजही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हेल्मटविषयी जागृकता नाही, याची मला खंत वाटते. हेल्मेट न घालता सर्रासपणे गाडय़ा वेगाने चालतात व अपघाताला सामोरे जातात. दुचाकीवर बसलेल्या दोघांनाही हेल्मट सक्ती केली, हा निर्णय खरंच स्वागतार्ह आहे. प्रशासनाने अशा प्रकारे कठोर होण्याची गरज आहे.
– मंदार खाबडे, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे.
मागे बसणाऱ्यालाही सक्ती
आपण नेहमी अपघाताच्या बातम्या ऐकतो, वाचतो. काही वेळा चालकाने हेल्मट घातल्यामुळे तो बचावतो, परंतु मागे बसलेल्या व्यक्तीला मात्र त्याचा जीव गमवावा लागतो. त्यामुळे लोकांनी हेल्मेट सक्तीच्या नियमांना अतिशय गांभीर्याने घेऊन स्वत:च्या आयुष्याला महत्त्व देणे गरजेचे आहे.
– सिद्धेश शेळके, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे.
लांबच्या प्रवासासाठी हवेच
डोंबिवली हे शहर छोटे शहर आहे. या शहरात गाडीला हवा तितका वेग नसतो. त्यामुळे या शहरात हेल्मेटची फारशी गरज जाणवत नाही. हायवे तसेच लांबच्या प्रवासासाठी गाडीवरून जायचे असल्यास हेल्मेट गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांनी पैसे न घेता गुलाबाचे फूल देऊन अशा लोकांना खजिल करावे. अपघात झाल्यानंतर पाठी बसलेल्या व्यक्तीला जास्त मार बसतो. त्यामुळे त्याच्यासाठीही हेल्मेट सक्ती करावी.
-अमोघ डोंगरे, पॉरेन्सिक सायन्स महाविद्यालय, मुंबई.
हेल्मेटमुळे आयुष्य सुरक्षित
हेल्मेटची सक्ती ही आवश्यक आहे. कारण यामुळे अपघात जरी घडला तरी तुमचा जीव सुरक्षित रहाणार आहे. भरधाव वेगाने जाणारी वाहने, त्यात नियम न पाळणारे चालक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आणि सध्या हेल्मेटमध्येही खुप प्रकार उपलब्ध असून त्यात वेगळे वाटण्यासारखे काही नाही.
– राकेश शिर्के, डोंबिवली.
प्रशासनाचा निर्णय योग्य
गाडी चालविताना हेल्मेट डोक्यात असल्याने प्रवासात जीव सुरक्षित राहतो. परंतु कामाच्या वेळेस, महाविद्यालयात हे हेल्मेट ठेवणे ते सांभाळणे हे फार किचकट वाटते. यामुळेच अनेक तरुण ते वापरताना दिसत नाहीत. परंतु अपघातात अनेकांना जीव गमवावा लागल्याने प्रशासनाने केलेली सक्ती ही चांगलीच आहे.
– नेहाल थोरावडे, डोंबिवली.