बदलापूर : पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते आणि ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तसेच विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर उमेदवारीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेतलेले सुभाष पवार लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी रविवारी बदलापुरात याबाबत घोषणा केली. विधानसभेनंतर पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सक्रीय नव्हते. ते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचीही चर्चा होती.
मात्र ते भाजपात येणार असल्याचे खुद्द किसन कथोरे यांनी जाहीर केल्याने शक्यतांवर पूर्णविराम लागला आहे. यापूर्वी किसन कथोरे यांनी त्यांच्याविरूद्ध निवडणूक लढवलेल्या शैलेश वडनेरे यांना पक्षात प्रवेश दिला होता. त्याचवेळी एक मोठा उमेदवार भाजपात येणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले होते. या प्रवेशामुळे शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले आहे. एकीकडे शिवसेनेकडून स्वबळाची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे भाजप स्वबळावर प्रचार सुरू करूनही युतीची चाचपणी करत आहे. त्याचवेळी दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या पक्षातील नाराज, उमेदवारी नाकारलेल्या पक्षांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र फक्त माजी नगरसेवकच नाही तर विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेल्या उमेदवारांनाही गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे.
ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत मोठा संघर्ष सुरू आहे. यात संघर्षात आता एकेकाळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले सुभाष पवार आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात जाण्याच्या मार्गावर आहे. याची माहिती खुद्द भाजपचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनीच याची माहिती दिली आहे.
बदलापुरात रविवारी शिवसेनेतून भाजपात आलेले महेश जाधव यांचा प्रवेश पार पडला. यावेळी बोलताना भाजप आमदार किसन कथोरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. काही हौशे गवशे विधानसभेत माझ्याविरुद्ध विरोधी उमेदवारांना बळ देत होते. पण आता विकासाच्या मार्गावर ते विरोधी उमेदवार भाजपात प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वी शैलेश वडनेरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सुभाष पवार हेसुद्धा प्रवेश करतील, असे आमदार किसन कथोरे यांनी जाहीर केले. काहींना वाटलं माझ्याविरोधात उभे राहणाऱ्यांना मदत केल्यास त्याचा पालिकेत फायदा होईल. पण आता तेच माझ्या सोबत येत आहेत. सुभाष पवार यांची मते आता भाजपाच्या पारड्यात जातील, असाही दावा आमदार किसन कथोरे यांनी केला.
शिवसेनेसाठी धक्का
सुभाष पवार यापूर्वी शिवसेनेत होते. त्यामुळे विधानसभेला मुरबाडची जागा भाजपकडे केल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत परततील अशी चर्चा होती. मात्र ते थेट भाजपात गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. हा शिवसेनेसाठी धक्का मानला जातो. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना पवार यांचा फायदा झाला असता. त्यामुळे मुरबाडमधील शिवसेनेच्या जागांनाही फटका बसू शकतो.
अजून चर्चा सुरू
अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, मात्र चर्चा सुरू आहेत, अशी माहिती सुभाष पवार यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. येत्या दोन दिवसात त्यावर निर्णय होईल, त्यावेळी बोलू असेही पवार म्हणाले आहेत.
