उल्हासनगर : शहरातील रस्त्यांवर आधीच मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त असताना, नव्या खोदकामामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यात १२ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे नेमलेल्या सुदर्शन इलेक्ट्रिक कंपनीच्या वतीने काम पाहणाऱ्या कंत्राटदाराने परवानगीतील अटी व शर्तींचे उल्लंघन करून उल्हासनगरातील किटीकेअर हॉस्पिटल ते टाउन हॉल या १६५ मीटर लांबीच्या सार्वजनिक रस्त्याचे खोदकाम केले. या खोदकामामुळे अंदाजे ४७ लाख ५२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले असून, उल्हासनगर पालिकेने त्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या उल्हासनगर शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. स्थानिक आमदार कुमार आयलानी यांनी नुकतेच महापालिका आयुक्तांना सात दिवसांच्या आत सर्व खड्डे बुजवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पालिकेने खड्डे बुजवण्याच्या कामाला गती देण्यास सुरुवात केली. या खड्डे भरण्याच्या कामासाठी कुणाचे प्रयत्न कामी आले यावर सध्या शहरात श्रेयवाद रंगला आहे. टीम ओमी कलानीच्या वतीने समाज माध्यमांवर शर्म करो गड्डे भरो ही मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र या सर्व टीका आणि इशाऱ्यात पालिकेने शहरात सुरू असलेल्या खड्डे बुजवण्याचे सुरू असलेले प्रयत्न जाहीर केले होते. त्यात खड्डे बुजवण्यासाठी जाहीर केलेली निविदा, त्याचे कार्यादेश आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात याचा कालावधी पालिकेने विषद केला होता. त्यामुळे या खड्डे भरण्याच्या कामाचे श्रेय घेणाऱ्या राजकारण्यांची कोंडी झाली होती.
शहरात खड्डे पूर्ववत करून रस्ते सुरळीत करत वाहतुकीला गती देण्याचा प्रयत्न पालिकेचा असताना शहरात खड्डा खोदला गेल्याने पालिकेने कठोर कारवाईचा बडगा उगारला. या अनधिकृत खोदकामामुळे रस्त्यांच्या पुनर्बांधणीच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. १२ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे नेमलेल्या सुदर्शन इलेक्ट्रिक कंपनीच्या वतीने काम पाहणाऱ्या कंत्राटदाराने परवानगीतील अटी व शर्तींचे उल्लंघन करून उल्हासनगरातील किटीकेअर हॉस्पिटल ते टाउन हॉल या १६५ मीटर लांबीच्या सार्वजनिक रस्त्याचे खोदकाम केले. या खोदकामामुळे अंदाजे ४७ लाख ५२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
नियमभंग करून करण्यात आलेल्या या खोदकामामुळे सार्वजनिक मालमत्तेचे झालेले मोठे नुकसान, वाहतुकीस झालेला अडथळा आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, या गुन्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेत संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.