कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख आणि करोना महामारी रोखण्याच्या कामासाठी गेल्या दीड महिन्यापूर्वीेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी (एमओएच) पदावर नियुक्त केलेले डॉ. सुरेश कदम यांची आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी तडकाफडकी उचलबांगडी केली. कदम यांच्या मंदगती कामाबद्दल वैद्यकीय आरोग्य विभाग कमालीचा त्रस्त होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कदम यांच्या जागी रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथील काम सांभाळून डॉ. पाटील यांना हे काम पाहायचे आहे. डॉ. कदम यांची पालिकेतील बहुतांशी सेवा क्षय रोग विभागात गेली.

दोन महिन्यांपूर्वी करोना महामारीचा कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात प्रादुर्भाव वाढत असताना वैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून तत्कालीन वैद्यकीय विभाग प्रमुख डॉ. राजू लवांगरे यांच्याकडून हवे तसे काम होत नसल्याच्या तक्रारी होत्या. वैद्यकीय विभाग या काळात गोंधळलेला होता. वैद्यकीय विभागाची करोनासंदर्भातील प्रत्येक गोष्ट आयुक्तांना हाताळावी लागत होती. त्यामुळे आयुक्तांनी डॉ. लवांगरे यांच्या जागी डॉ. कदम यांना आणले होते. तेही लवांगरे यांच्यासारखेच संथगती कारभार करत असल्याच्या तक्रारी होत्या. करोना महामारी रोखण्यात पालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर वैद्यकीय प्रमुख म्हणून कदम यांचे कोणतेही नियंत्रण नव्हते. प्रभागांमध्ये सुरू असलेल्या सर्वेक्षणात ताळमेळ नव्हता. नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सुरू असलेल्या सावळ्या गोंधळावर कदम यांचा वचक नव्हता. रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका न मिळणे, रुग्णालयात प्रवेश न मिळणे, पालिका नियंत्रित करोना रुग्णालये रुग्णांकडून दामदुप्पट शुल्क वसूल करीत होते. या सर्व परिस्थितीतवर वैद्यकीय प्रमुख म्हणून डॉ. कदम यांनी अंकुश लावणे आवश्यक होते. परंतु मागील तीन महिन्यांत या आघाडीवर अनेक तक्रारी पुढे येत होत्या. खासगी डॉक्टरांच्या संघटनेतील एका डॉक्टरने वैद्यकीय विभागातील भोंगळ कारभाराची माहिती एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याला दिली.

त्याचा फटका कदम यांना बसल्याची चर्चा आहे.

महापालिका नियंत्रित कल्याणमधील होली क्रॉस करोना रुग्णालयातील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा २० दिवसांपासून बंद पडूनही याविषयी कदम यांनी ठोस पावले उचलली नाहीत. करोना रुग्णांना मोफत इंजेक्शन औषध देण्याचा शासनाचा आदेश येऊन १४ दिवस उलटले तरी या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कदम यांनी विलंब लावला. मंजुरीच्या नस्तींवर अनावश्यक शेरे मारून त्या लालफितीत ठेवणे, असे प्रकार अलीकडे वाढले होते, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात एका जाणकाराने आयुक्तांकडे तक्रार केली होती. कदम यांच्या कामकाजाविषयी सर्वच स्तरांत नाराजी होती. त्यांची नियुक्ती कल्याण पूर्वेतील विलगीकरण नियंत्रक अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

प्रभाग अधिकाऱ्यांच्याही बदल्या

कल्याण : प्रशासकीय कामाच्या सोयीसाठी प्रशासनाने मंगळवारी तीन प्रभाग अधिकारी यांच्या बदल्या केल्या. बदलीची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीत होत असताना  बदल्या थेट आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आरोग्य मुख्यालयातील अधीक्षक भागाजी भांगरे यांची क प्रभागात प्रभाग अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मागील दोन वर्षांपासून भांगरे हे बेकायदा बांधकामे प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखले जातात. ह प्रभागात असताना करोना साथीच्या काळात प्रभागात विवाह सोहळा पार पडला तरी यजमानांवर कारवाई न केल्याने भांगरे यांना आयुक्तांनी निलंबित केले होते. ग प्रभागाचे प्रभाग अधिकारी अक्षय गुडधे यांची घनकचरा विभागाचे साहाय्यक आयुक्त, नागपूर येथून पालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या मुख्याधिकारी संवर्गातील घनकचरा विभागाच्या साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे यांची ग प्रभाग अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशासकीय सेवेचा भाग म्हणून आपली बदली झाली आहे.

आपल्या निवृत्तीला एक महिना शिल्लक आहे. त्याची काही कागदपत्रो तयार करायची आहेत. यापूर्वीच्या रजा शिल्लक आहेत. या सगळ्या प्रक्रिया पार पाडणे महत्त्वाचे आहे. आपली बदली रुक्मिणीबाई रुग्णालयात करण्यात आली आहे. बदलीचे अन्य कोणते कारण नाही.

– सुरेश कदम, वैद्यकीय अधिकारी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudden transfer of health officials by kdmc commissioner zws
First published on: 06-08-2020 at 03:31 IST