लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या भिवंडीतील अनधिकृत गोदामांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पाहाणी केली. प्रशासनाच्या या कारवाईनंतर भिवंडीत विविध चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा अधिकाऱ्यांवर दबाव आहे. त्यांना पराभव दिसत असल्याने ही कारवाई केली जात आहे, असा आरोप सुरेश म्हात्रे यांनी केला आहे.

भिवंडीचे खासदार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. गुरुवारी शरद पवार गटाने येथून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी मिळताच, अवघ्या काही तासांत त्यांच्या येवई येथील आर. के. लॉजी वर्ल्ड येथील गोदामांची पाहणी करण्यासाठी एमएमआरडीएचे अधिकारी गेले होते. कोणतीही नोटीस बजावली नसताना अचानक पथक आल्याने ही राजकीय आकसापोटी कारवाई झाल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला.

हेही वाचा >>>भिवंडीच्या बदल्यात सातारा काँग्रेसला? पृथ्वीराज चव्हाण यांना लढण्यासाठी आग्रह

मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि आता पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असा सुरेश म्हात्रे यांचा आतापर्यंतचा प्रवास राहिला आहे. गोदामांवरील कारवाई टाळण्यासाठी त्यांनी तेव्हा राष्ट्रवादीतून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा होती. परंतु निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. कारवाई करण्याच्या उद्देशाने हे अधिकारी तेथे गेले होते. परंतु हा प्रकल्प नियमित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. राज्य सरकारने संपूर्ण भिवंडीसाठी तसा शासन निर्णय काढला होता. तसेच कारवाई टाळण्यासाठी उच्च न्यायालयाकडून स्थगिती देखील आणली आहे. आमच्यावर दबाव आहे असे अधिकारी म्हणत आहेत. अर्थात हा दबाव कपिल पाटील यांचा आहे. आम्ही लढू आणि जिंकू.- सुरेश म्हात्रे, उमेदवार, शरद पवार गट