कल्याण- सात वर्षापूर्वी उल्हासनगरमधील केबल व्यावसायिक सच्चानंद करीरा यांची कुख्यात गुन्हेगार सुरेश पुजारी याच्या हस्तकाने दिवसाढवळ्या हत्या केली होती. या हत्येच्या तपासात उल्हासनगर पोलिसांना पुजारीचा ताबा पाहिजे होता. गेल्या वर्षापासून पोलिस त्याचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. अखेर गुरुवारी त्याचा ताबा मुंबई पोलिसांनी उल्हासनगर पोलिसांना दिला.

पुजारीला उल्हासनगरमध्ये आणताच पोलीस ठाण्याभोवती विशेष सुरक्षा पथकाची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. सुरेश पुजारी याच्यावर ठाणे, मुंबई परिसरात एकूण २४ गुन्हे दाखल आहेत. १५ गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलीस आयुक्तालय, सात गुन्ह्यांची नोंद ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पोलीस ठाण्यांमध्ये आहे. खंडणी, हत्या, दहशत अशाप्रकारचे हे गुन्हे आहेत.


केबल व्यावसायिक करीरा याच्या हत्या प्रकरणी सुरेश पुजारीची चौकशी उल्हासनगरचे साहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड करत आहेत. सच्चानंद करारा हे उल्हासनगरमधील बडे केबल व्यावसायिक होते. त्यांना खंडणीसाठी पुजारीच्या हस्तकांकडून त्रास दिला जात होता. धमक्या दिल्या जात होत्या.

खंडणी मिळत नाही लक्षात आल्यावर पुजारीच्या हस्तकांनी सात वर्षपूर्वी करारा यांच्या उल्हासनगर पूर्वेतील गोलमैदान येथील त्यांच्या कार्यालयात दिवसाढवळ्या घुसून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी नितीन अवघडे याला अटक केली होती. त्याच्या साक्षीतून पुजारीचे नाव पुढे आल्याने या प्रकरणात सुरेश पुजारीचा हात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. तेव्हापासून पोलीस पुजारीच्या मागावर होते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई, उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथक, विशेष सुरक्षा पथकाच्या गराडयात गुरुवारी दुपारी पुजारीला उल्हासनगरमध्ये आणण्यात आले. राज्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये पुजारी पोलिसांना हवा होता. पंधरा वर्षापासून तो विदेशात फरार होता. त्याच्या अटकेसाठी महाराष्ट्र पोलीस प्रयत्न करत होते. अखेर गेल्या वर्षी त्याला फिलीपाईन्स देशातून अटक करण्यात येऊन त्याला भारतात आणण्यात आले. पोलिसांना त्याच्या अटकेसाठी रेड कॉर्नर नोटीस जाहीर केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


सुरेश आणि रवी पुजारी पूर्वी दोघे एकत्र गुन्हेगारी विश्व चालवत होते. त्यानंतर त्यांच्यात फूट पडली. दोघांच्या स्वतंत्र टोळ्या गुन्हेगारी विश्वात काम करू लागल्या. ठाणे जिल्ह्यातील डॉक्टर, हॉटेल व्यावसायिक, राजकारणी, उद्योजक, विकासक यांना खंडणीसाठी धमकावयाचे. खंडणी न दिल्यास त्यांची हत्या करायची अशी टोळीवाल्यांची कृत्य होती. सुरेश पुजारी विदेशात असला तरी त्याच्या नावाने हस्तकांकडून खंडणीसाठी धमक्या दिल्या जात होत्या. तो अटक झाल्यापासून मात्र त्याच्या टोळीचे काम थंडावले. त्याच्या नावे होणारे धमकीसत्र थांबले आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.