कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन मुलीची एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून दोन दिवसापूर्वी हत्या केली. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी. या प्रकरणाचा सखोल तपास करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी कल्याण येथील अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभागाला लक्ष्य केले.

हेही वाचा >>> ठाणे जिल्हा प्रशासनाकडून वाळूमाफियांवर कारवाई; लोकसत्ताच्या वृत्तानंतर माफियांवर कारवाईचा बडगा

कल्याण शहरात गु्न्हेगार मोकाट फिरत आहेत. अत्याचार, लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. खा. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात सलग तीन दुर्घटना अलीकडे घडल्या आहेत. गृह विभागाचा आपल्या विभागावर वचक नसल्याचे यामधून स्पष्ट होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या खात्याचा वापर फक्त सत्ता संघर्षासाठी करत आहेत, अशी टीका अंधारे यांनी केली.

हेही वाचा >>> कळवा रुग्णालयातील मृतांच्या शवविच्छेदनाचे अहवाल समितीने घेतले ताब्यात; दुसऱ्या दिवशीही चौकशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा दुर्घटना घडल्या की पोलीस बळ कमी आहे सांगितले जाते. त्याच बरोबर शिंदे समर्थकांना मात्र अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाते. त्यावेळी पोलीस बळ कोठुन उपलब्ध होते, असा प्रश्न अंधारे यांनी केला. आरोपी आदित्य कांबळे २० वर्षाचा सज्ञान आहे. त्याला अल्पवयीन ठरविण्याचा प्रयत्न कोणी करू नये. त्याच्या कृत्याची शिक्षा त्याला झालीच पाहिजे, अशी मागणी अंधारे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात वाढणारी गुन्हेगारी गंभीर दखल घेण्यासारखी आहे, असे त्या म्हणाल्या. कल्याण लोकसभेच्या जागेवर भाजपकडून दावा ठोकला जात आहे. माझा भाचा खूप समजुतदार आहे. त्यागशील वृत्तीचा आहे. त्यांचे हिंदुत्व आता भाजपकडे गेले आहे. त्यामुळे हिंदुत्वासाठी त्यांनी ही जागा हसत सोडावी म्हणजे संघर्ष होणार नाही, असे टोमणा अंधारे यांनी खा. शिंदे यांना लगावला.