महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांबाबत सातत्याने तक्रारी करीत असून याप्रकरणी वरिष्ठांच्या निर्देशानुसार संबंधित बिल्डरमंडळी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच संबंधित साहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे. भिवंडीत बेकायदा बांधकामप्रकरणी उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्यात आले आहे. मग, अशी कारवाई ठाण्यात का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >>> टेंभी नाक्याच्या उत्सवाला मुख्यमंत्र्यांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न – शिवसेना ठाणे जिल्हा प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांचा आरोप

ठाणे महापालिका क्षेत्रात भुमाफियांकडून बेकायदा बांधकामे उभारण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून अशाच प्रकारची तक्रार आमदार संजय केळकर यांच्याकडून सातत्याने पालिकेकडे करण्यात येत आहे. बेकायदा बांधकामे सुरु असल्याचे पुरावेही त्यांनी दिले आहेत. त्यानंतरही त्या बांधकामांवर कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी यापुर्वीच नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर हा मुद्दा त्यांनी विधानसभेतही उपस्थित केला होता. असे असतानाच त्यांनी मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन त्यांना याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. बेकायदा बांधकामप्रकरणी वरिष्ठांच्या निर्देशानुसार संबंधित बिल्डरमंडळी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच संबंधित साहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. भिवंडीत बेकायदा बांधकामप्रकरणी उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्यात आले आहे. मग, अशी कारवाई ठाण्यात का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी यावे‌ळी उपस्थित केला.

हेही वाचा >>> मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

अतिक्रमित उद्यान खुले होणार
माजीवड्यात ठाणे महापालिकेचे उद्यान आहे. उद्यान दोन्ही बाजूंनी बंद करण्यात येऊन तिसऱ्या बाजूची भिंत तोडण्याचा आणि ते अतिक्रमित करण्याचा ठेकेदाराचा डाव असल्याची बाब स्थानिकांनी आमदार संजय केळकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. नागरिकांनी या उद्यानात प्रवेश केल्यानंतर त्यांना विरोधही झाला होता. याप्रकरणी केळकर यांनी प्रभाग समिती आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांना या उद्यानाबाबत आणि त्यातील अतिक्रमणाबाबत माहितीच नसल्याचे पुढे आले. मंगळवारी केळकर यांनी आयुक्त शर्मा यांची भेट घेतली, त्यावेळेस त्यांनी उद्यानातील अतिक्रमणाबाबत आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर कारवाई करून उद्यान खुले करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. अशा पद्धतीने प्रशासनाची भूमिका राहिली तर अनेक उद्याने आणि भूखंड हातातून जातील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. यावर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत उद्यान नागरिकांसाठीच राहणार असल्याचे सांगत अधिकाऱ्यांना तशा सूचनाही दिल्याची माहिती केळकर यांनी दिली.