सर्वसाधारणपणे हिवाळ्यात मांसाहार करणे चांगले असले तरी सामिष खाणाऱ्यांना ऋतुचे वावडे नसते. मांसाहाराशिवाय त्यांचे पानही हलत नाही. त्यामुळेच बाहेर उकडत असले तरी मेजवानीचे तिखट बेत आखले जातात. त्यांच्या जिभेवर तसेच मनातही सतत चिकन तंदुरी, मटण शीग कबाब किंवा फिश तंदुरी अशा पदार्थाची चव रेंगाळत असते. अशी मंडळी सतत नव्या चवीचे अड्डे शोधत असतात. सध्या ठाण्यात तंदुरी दरबार नामक फूड ट्रकचा बोलबाला आहे. अगदी अल्पावधीच त्याने खवय्यांची पसंती मिळवली आहे. विशेष म्हणजे इतर कॉर्नरच्या तुलनेत त्यांचे दरही किफायतशीर असल्याने येथील मेजवानी स्वस्त आणि मस्त आहे. सुनील मोनीस यांनी ५ महिन्यांपूर्वी तंदुरी दरबार हा ठाण्यामधील पहिला फूड ट्रकवरील तंदुरी कॉर्नर सुरु केला. इथे आपल्याला चिकन, मटण आणि फिश तंदुरीच्या एकूण २४ प्रकारांची चव चाखायला मिळते.
सध्या खाद्यपदार्थामध्ये फ्यूजन खाद्यपदार्थाना सर्वात जास्त मागणी आहे. त्यात दोन पदार्थाच्या रेसिपीज् एकत्र करून नवाच पदार्थ तयार केला जातो. तंदुरीचा जन्म तसा अगदी अलीकडचा. १९४७ मध्ये नवी दिल्लीमध्ये जेव्हा पहिल्यांदा तंदुरी हा पदार्थ केला गेला, तेव्हा फक्त अद्रक, लसूण पेस्ट, दही आणि लाल मिरची पावडरचं एकत्रित मिश्रण करून चिकन तंदुरी तयार केली जात असे. बदलत्या काळानुसार तंदुरीमध्येही पहाडी तंदुरी, काळीमिरी तंदुरी असे अनेक नवनवीन प्रकार येत गेले. येथेही आपल्याला पुदिना, कोथिंबीर, दही, अद्रक, लसूण पेस्ट आणि तिखट मिठाचं मिश्रण तंदूरवर लावून तयार केलेली पहाडी तंदुरी, काळीमिरी, मीठ, अद्रक, लसूण पेस्टचे मिश्रण चिकनवर टाकून तयार केलेली नावीन्यपूर्ण अशा तिखट चवीच्या काळीमिरी तंदुरीची चव चाखायला मिळते.
तंदूर कॉर्नर म्हटले की तंदुरीबरोबर टिक्का आणि कबाब तर आलेच. येथे आपल्याला चिकन टिक्का, तिखट चवीचा चिकन काळीमिरी कबाब, चिकन पहाडी कबाब उपलब्ध आहेत. दही, अद्रक, लसूण पेस्टचे मिश्रण आणि लसूणचा फ्लेवर देऊन तयार केलेला चिकन लसुनी कबाब , दही, चीज, क्रीम, काळं मीठ आणि हिरवी वेलचीचे एकत्रित मिश्रण करून तयार केलेला स्वीट अँड सॉल्टी चिकन मलाई कबाब असे काही वैशिष्टय़पूर्ण कबाब म्हणजे काबाबप्रेमींसाठी चंगळच. या ‘तंदुरी दरबार’चे वेगळेपण म्हणजे येथे मिळणारा तंदुरी लॉलीपॉप आणि चिकन लेग तंदुरी.
आपण दरवेळी फाईड म्हणजेच तेलात तळलेले लॉलीपॉप खातो, परंतु येथे चिकन तंदुरीप्रमाणेच लेगपीसला मॅरिनेशन करून हे लॉलीपॉप तंदूर भट्टीवर भाजून आपल्याला खायला दिले जातात. त्यामुळे लॉलीपॉप आणि लेग तंदुरीची मस्त आगळीवेगळी चव आपणास चाखायला मिळते.
त्याचप्रमाणे इथे खोबरं टाकून मालवणी पद्धतीने बनवलेलं झणझणीत मटण मालवणी, पंजाबी पद्धतीने बनवलेली चिकन हंडी आणि भाकरी म्हणजे स्टार्टर्ससोबत एक प्रकारचे संपूर्ण जेवणच. फिश आवडणाऱ्यांसाठी येथे पापलेट तंदुरी, प्रॉन्स तंदुरी आणि रावस तंदुरीही उपलब्ध आहे.
‘तंदुरी दरबार’चे वैशिष्टय़ म्हणजे येथे मिळणारी वैशिष्टय़पूर्ण अशी चिकन अरबी तंदुरी आणि चिकन बंजारा कबाब. अरबी तंदुरीचे वैशिष्टय़ म्हणजे ही तंदुरी फक्त दही आणि मिठाचं एकसंध मिश्रण चिकनवर लावून भाजून बनवली जाते. त्यामुळे तिखट अजिबात न खाणाऱ्यांनी आणि सतत नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थाच्या शोधात असणाऱ्या खाद्यप्रेमींनी अरबी तंदुरी नक्की खावी. कढीपत्ता, दही, अद्रक, लसूण पेस्टचे एकसंध मिश्रण चिकनला लावून चिकन बंजारा कबाब तयार केला जातो. या कबाबला कढीपत्त्याची चव असल्याने यास बंजारा कबाब म्हणतात. त्यामुळे अजून एक वेगळ्या चवीचा कबाबही येथे चाखायला मिळतो.
कुठे?
- तंदुरी दरबार, ऋतू टॉवर्सच्या शेजारी, हिरानंदानी इस्टेटजवळ, पातलीपाडा, ठाणे (प)