tvlog01 पण बहुधा कटलेट? बिलकूल नाही. मात्र कल्याणचे ‘सुपर फूड अंबर वडा’ हे स्नॅक्स कॉर्नर यास अपवाद आहे. येथे मिळणाऱ्या गरमागरम ब्रेड कटलेटवर ताव मारण्यासाठी खवय्यांची प्रचंड गर्दी येथे होते. बिर्ला महाविद्यालयापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेले हे स्नॅक्स कॉर्नर महाविद्यालयीन तरुणांमध्ये तर भलतेच लोकप्रिय झाले आहे.
गरमागरम ब्रेड कटलेट आणि सोबत साथीदारीण असलेली आंबट, तिखट, गोड असे विविध खाद्यपैलू चाखायला लावणारी लाल चटणी. बटाटय़ाची भाजी, कांदा, टॉमेटो यांच्या मिश्रणातून बनलेले सारण ब्रेडमध्ये भरले जाते. त्यानंतर बेसनाचा मुलामा देऊन या चविष्ट अशा ब्रेड कटलेटला तळले जाते.
या ब्रेड कटलेटसोबत गूळ, खजूर, चिंच, मिरची व स्पेशल मसाला वापरून बनवलेली आंबट, तिखट, गोड अशी लाल चटणी खवय्यांसमोर सादर केली जाते. ब्रेड कटलेटला या लाल चटणीत संपूर्णपणे बुडवून खवय्ये ब्रेड कटलेटचा आस्वाद घेत असतात. याबरोबरच मिरची, कांदा, लसणाच्या सुक्या चटणीने या ब्रेड कटलेटची रंगत वाढवली जाते. अजित खारकर, हरिष प्रभू व अंबर खारकर यांनी मिळून १३ वर्षांपूर्वी म्हणजे २००२मध्ये कल्याणमधील कर्णिक रोड परिसरात आपला हा फूड कॉर्नर सुरू केला. सुरुवातीच्या काळात मुख्यत: वडा-पाव, इडली, मिसळ, ब्रेड कटलेट, समोसा हे पदार्थ सुरू करण्यात आले. पहिल्यांदा छोटय़ा गाळ्यात सुरू झालेला हा व्यवसाय खवय्यांच्या पसंतीमुळे बहरत गेला. हरिष प्रभू यांच्या हाताच्या चवीमुळे तर अंबर खारकर यांच्या ‘अंबर’ या नावामुळे या कॉर्नरची ख्याती सर्वत्र पसरली. ‘सुपर फूड अंबर वडा स्नॅक्स कॉर्नर’ आजही ‘अंबर वडा’ या नावाने ओळखले जातो. आजही कल्याणकर भेटण्याची जागा म्हणून अंबर वडय़ास पसंती देतात.
लहान मुलांसाठी, मध्यमवर्गीय खवय्यांसाठी चुरा-पाव हा पदार्थ येथे सुरू करण्यात आला. तो आजही खवय्यांमध्ये लोकप्रिय आहे. महागाईच्या जमान्यातही या चुरा-पावची किंमत आहे, फक्त पाच रुपये. त्याचबरोबर मन थंड करणारे मसाला ताकही येथे खूप प्रसिद्ध आहे. ब्रेड कटलेट किंवा चुरा-पावचा आस्वाद घ्यायचा आणि त्यानंतर मस्तपैकी थंडगार ताक प्राशन करायचे हे येथे येणाऱ्या खवय्यांचे ठरलेलेच. अंबर वडा येथे नेहमीच खवय्यांची गर्दी असते. उन्हाळ्यात दुपारच्या उन्हाची पर्वा न करता, पावसाळ्यात कितीही पाऊस असला तरीही दर्दी खवय्ये येथील पदार्थावर ताव मारण्यासाठी उपस्थिती लावतात.
 ‘आमची कुठेही शाखा नाही’ हे मराठी माणसाचे ब्रीदवाक्य. पण खारकर बंधू यास अपवाद. खवय्यांचा वाढता प्रतिसाद पाहता अजित खारकर, हरीश प्रभू व अंबर खारकर यांनी २००८ मध्ये कल्याणमधील बेतुरकर पाडा येथे आपल्या दुकानाची आणखी एक शाखा सुरू केली. खवय्यांचे वाढते प्रेम पाहून उल्हासनगर येथेही एक शाखा सुरू करण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेतील डी-मार्टजवळील गोदरेज हिल परिसरात व झुंजारराव मार्केटमध्ये नुकत्याच आणखी शाखा सुरू झाल्या आहेत. डोंबिवलीतही आपला व्यवसाय प्रस्थापित करण्याचा या उद्योजकांचा विचार आहे. अंबर वडा येथे वेळेनुसार ग्राहक आपली खाद्यपसंती नोंदवतात. कर्णिक रोड येथील अंबर वडा येथे सकाळच्या वेळेत ‘पोहे’ तर बेतुरकरपाडा येथे असलेल्या अंबर वडय़ाच्या शाखेतील ‘उपमा’ प्रसिद्ध आहे. अंबर वडा येथे लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच खवय्ये उपस्थिती लावतात. अंबर वडा येथे दररोज साबुदाणावडा मिळतो तर उपवासाच्या दिवशी खास नारळाच्या कचोऱ्यांची मेजवानी असते.

अंबर वडापाव
सूपर फूड (अंबर वडापाव) स्नॅक्स कॉर्नर
कर्णिक रोड, कल्याण (प.)
वेळ : सकाळी ५ ते रात्री १०
 
सूपर फूड (अंबर वडापाव) स्नॅक्स कॉर्नर
बेतुरकर पाडा, बेचनाबाई चाळ, कल्याण (प.)
वेळ : सकाळी ७.३० ते रात्री ९.३०

किंमत
ब्रेड कटलेट : २२ रुपये
वडापाव : १२ रुपये
चुरा-पाव : ५ रुपये
मसाला ताक : १२ रुपये