बदलापूरः बदलापूर शहरात दोन दिवस सलग झालेल्या मुसळधार पावसात शहरातील सर्वात मोठा नैसर्गिक नाला असलेल्या मांजर्ली नाल्याची पाणी पातळी वाढली होती. या पाण्यात मंगळवारी पश्चिमेत शनिनगरकडे जाण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला नाल्यावरील पूल वाहून गेला. येथील पूल जुना झाल्याने तो पाडून नवा उभारला जाणार होता. मात्र पावसामुळे त्याचे काम रखडले. नागरिकांच्या मागणीनुसार येथे तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. आता तोही वाहून गेल्याने नागरिकांना मोठा फेरा मारून ये जा करावे लागणार आहे.

बदलापूर शहरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. बदलापुरच्या वेशीवर असलेल्या डोंगररांमध्ये पडणाऱ्या पावसाचे पाणी शहरातील सर्वात मोठ्या नाल्यातून वाहून पुढे उल्हास नदीला जाऊन मिळते. उल्हास नदीत पाणी पातळी वाढल्यास नाल्यातील पाणी पुढे जात नाही. परिणामी नाल्याच्या आणि नदीच्या शेजारी असलेल्या भागात पाणी शिरते. याच नाल्याच्या शेजारी बदलापूर पश्चिमेत शनिनगर परिसरात रेल्वे स्थानक परिसराला जोडणारा एक पादचारी पूल होता. या पुराची दुरावस्था झाल्याने तो पाडून तेथे नव्या पुलाची उभारणी करण्याचे काम पालिकेने हाती घेतले होते. मात्र मे महिन्यापासून पाऊस सुरू झाल्याने पुलाचे काम रखडले, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिली.

नागरिकांनी मागणी केल्याप्रमाणे येथे तात्पुरत्या स्वरूपात पूल बांधून दिला होता. मात्र हा पूल तात्पुरता आणि कमकुवत होता अशी टीका अनेकदा झाली. या पुलावर कधीही अपघात होऊ शकतो अशीही भीती अनेकांना वाटत होती. या पुलामुळे शनीनगर हा ८ ते १० हजार लोकवस्तीच्या भागाला थेट स्थानकाशी जोडता येते. त्यामुळे येथील नागरिकांचा मांजर्ली रस्त्याने येण्याचा फेरा वाचतो. त्यामुळे हा पादचारी पूल नागरिकांसाठी महत्वाचा होता. मात्र मंगळवारी येथील नाल्याची पाणी पातळी पावसामुळे वाढली. परिणामी या पुलाला पाणी लागले होते.

खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना यावरून प्रवास बंद केला होता. त्याचवेळी दुपारच्या सुमारास हा पूल पाण्यात चक्क वाहून गेला. सुरूवातीला हा पूल एका बाजूला कलला. येथील नागरिकांनी पूल वाहून जाण्याचे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. पाण्याचा प्रवाह वाढल्याने हा पूल संपूर्ण सांगाड्यासह वाहून गेला. यासोबत शेजारी असलेला एक पथदिवाही पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

पावसामुळे या पुलाचे काम थांबले होते. पाऊस बंद होताच पुन्हा हा पूल कायमस्वरूपी उभारण्याचे काम सुरू केले जाईल, अशी माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिली आहे. नागरिकांनी मागणी केल्यानुसार पूल उभारला होता, असेही त्यांनी सांगितले.