ठाणे : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचत एका शिक्षक आणि मुख्याध्यापकाला ६०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
बनावट सेवा पुस्तिका तयार करून त्यावर वेतन आयोगानुसार नोंदी आणि शिक्के घेण्यासाठी शिक्षक शहाजान मोहम्मदअली मौलाना आणि मुख्याध्यापक जियाउर रहमान मजहरुल्हक अन्सारी या दोघांनी ५०,००० रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सांगितले होते. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, शहाजान मौलाना यांनी लाचेची मागणी केली आणि मुख्याध्यापक अन्सारी यांनी त्या मागणीस दुजोरा देऊन तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रवृत्त केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, ३० एप्रिल रोजी शिक्षक मौलाना यांनी तक्रारदारास पुन्हा संपर्क करून, मूळ लाच रक्कमेसोबतच खासगी टायपिस्ट आणि शिक्क्यांसाठी अतिरिक्त १०,००० रुपये मागणी केली. त्यामुळे एकूण लाच रक्कम ६०,००० रुपये इतकी झाली.
यावर १ मे रोजी ठाणे एसीबीने कारवाई करत शहाजान मौलाना यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडले, तर मुख्याध्यापक अन्सारी यांनाही अटक करण्यात आली. दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.