scorecardresearch

ठाणे जिल्ह्याचा पारा वाढला, तापमान ४० च्या पुढे; कर्जत शहरात सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअसची नोंद

ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार गेले होते

गेल्या काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या वाढीनंतर आज तापमानाने चाळीशी गाठली. ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार गेले होते. उत्तरेतून येणारे उष्ण आणि कोरडे वारे तसेच राजस्थान, गुजरातवर निर्माण झालेला उच्च दाबाचा पट्टा यामुळे ठाणे जिल्ह्यातील तापमानात वाढ झाल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे. येत्या आठवडाभरात अशाच प्रकारचे तापमान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

गेल्या वर्षात सुमारे आठ महिने पावसाळ्याचा अनुभव घेतल्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ठाणे जिल्ह्यातील तापमान आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात कडकाच्या थंडीचा अनुभव यंदा आला. त्यानंतर यंदाच्या उन्हाळ्यात तापमान उच्चांक गाठेल अशी शक्यता होती. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला होता. त्यातच गेल्या काही दिवसांपासून उत्तरेतून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांमुळे ठाणे जिल्ह्यातील तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सोमवारी ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये तापमानाने चाळीशी गाठली होती.

ठाणे जिल्ह्याच्या शेजारील कर्जत शहरात सर्वाधिक ४१अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे सकाळी ११ वाजल्यापासून उन्हाच्या झळा बसू लागल्या होत्या. दुपारच्या सुमारास तापमानाने उच्चांक गाठला होता. त्यामुळे रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ झाल्याने नागरिकांची लाही लाही होत होती. उत्तरेतून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यामुळे कोकणातील तापमानात वाढ होत असल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.

गुजरात आणि राजस्थानवर तयार झालेल्या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे हाय प्रेशर झोन तापमानात वाढ होते आहे. तसेच समुद्रकिनारी असलेल्या शहरांमध्ये समुद्रावरून येणारे वारे उशिरा येत असल्याने ११ पासूनच तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते. हवेतील साक्षेपी आर्द्रता १० पेक्षा खाली गेल्याने तापमानात वाढ होत असल्याचे निरीक्षण मोडक यांनी नोंदवले आहे. भारतीय हवामान खात्याने या आठवड्यात बुधवारपर्यंत ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये तापमान उच्चांकी गाठेल, असा अंदाज वर्तवला आहे. तर आठवड्याच्या शेवटापर्यंत उन्हाच्या झळा बसतील अशी शक्यता आहे. येत्या आठवडाभरात नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या काळात बाहेर फिरणे टाळावे. दिवसभरात पाण्याचे भरपूर सेवन करावे, असे आवाहन डॉक्टरांच्या वतीने करण्यात आले आहे.

शहर निहाय तापमान

कर्जत – ४१.३
कोपरखैरणे – ४०.६
कल्याण – ४०.४
डोंबिवली – ४०.४
बदलापूर – ४०.४
मनोर – ४०.४
ठाणे – ४०.४
भिवंडी – ४०.४
पनवेल – ४०.३
तळोजा – ४०.३
उल्हासनगर – ४०.२
मुंब्रा – ४०.२

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Temperature of thane reached 40 degree celsius sgy

ताज्या बातम्या