डोंबिवली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन टेकड्यांवरील घनदाट जंगलाने वेढलेल्या प्रशस्त मैदानात पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत असताना, दहशतवाद्यांनी या टेकड्यांवरील मैदानात पोलिसी वेशात मंगळवारी दुपारी प्रवेश केला. पुरुष, महिला, लहान मुलांना दोन गटांत विभागले. संबंधित पुरुष पर्यटक कोणत्या धर्माचा आहे हे पाहण्यासाठी त्यांच्या अंगावरील कपडे उतरवले. तो पुरुष हिंदू आहे याची खात्री पटल्यावर दहशतवाद्यांनी कुटुंबीयांच्या समोर ठार मारले. आपल्या कुटुंबातील सदस्याला दहशतवाद्यांकडून ठार मारले जात असताना, जागीच तडफड, हताशपणे पाहण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाही या विचाराने कुटुंबीयांची घालमेल झाली होती. अशाच एका पर्यटकामध्ये डोंबिवली पश्चिमेत सुभाषचंद्र रस्ता भागात कोल्हापुरे चौकातील इमारतीत संजय लेले यांच्या कुटुंबीयांचा समावेश होता. लेले यांच्या पत्नीला पार्किनन्सचा त्रास आहे. त्यांना मोकळ्या वातावरणाचा आनंद घेता यावा. मुलाच्या शाळेला सुट्टी लागली आहे. त्यामुळे लेले कुटुंबीयांनी खास मित्रांसह जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी जाण्याचा निर्णय घेतला.

लेले यांनी पंडित दीनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौक भागात राहणारे आपले मित्र अतुल मोने, भागशाळा मैदान परिसरात राहणारे हेमंत जोशी यांच्यासह काश्मीरला पहलगाम येथे जाण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी ते तेथे पोहचले. मोने हे नोकरी आणि भिक्षुकी करत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बैसरन टेकड्या भागात जाण्यासाठी घोडे, खेचरांचा वापर केला जातो. घनदाट जंगलाने वेढलेल्या टेकड्यांवर सुमारे ४० ते ५० एकरचे प्रशस्त मैदान आहे. संजय लेले स्वत:, पत्नी, मुलगा, हेमंत जोशी आणि अतुल मोने या टेकड्यांवर मंगळवारी पर्यटनाचा आनंद घेत होते. दुपारच्या वेळेत अचानक पोलिसी वेशात बैसरन टेकड्यांवरील मैदानात दहशतवादी आले. त्यांनी मैदानाच्या एका भागात घनदाट जंगलाला लागून असलेल्या खानपान सेवेच्या ठिकाणी येऊन पर्यटकांना वेठीस धरले.