डोंबिवली – कल्याण-डोंबिवली शहरां दरम्यानच्या कचोरे ते ठाकुर्ली भागातील ९० फुटी रस्त्यावर रात्रीच्या वेळेत वेगळ्या प्रांतामधील लांब प्रवासाची मालवाहू अवजड वाहने मागील काही दिवसांपासून उभी करण्यात येत आहेत. ही मालवाहू वाहने ९० फुटी रस्त्यावर आली की त्यांच्या टपाच्या उंचीमुळे या रस्त्यावरील कल्याण डोंबिवली पालिकेच्या पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना धक्का लागत आहे. गेल्या महिन्यापूर्वी असा प्रकार घडला होता. याप्रकरणी पालिकेने अज्ञात वाहन चालका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनंतर गेल्या आठवड्यात पुन्हा एक उंच लांब प्रवासाचे अवजड वाहन मध्यरात्रीच्या वेळेत ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर उभे करण्यात आले होते. तीन ते चार दिवस या अवजड मालवाहू वाहनाचा मुक्काम म्हसोबा चौक भागातील वाहनळाच्या बाजुला होता. या अवजड वाहनांमुळे सुस्थितीत असलेला ९० फुटी रस्ता खराब होण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीच्या वेळेत देशाच्या विविध भागातील अवजड मालवाहू वाहने धावत असतात. ही वाहने एक विशिष्ट धाव मर्यादेनंतर रात्रीच्या वेळेत वाहने उभी करण्यासाठी जागा शोधतात. कल्याण, डोंबिवली हद्दीत ही वाहने आली की पत्रीपूल येथे ही अवजड वाहन वळण घेऊन ९० फुटी रस्ता येथे थांबा घेण्यासाठी येतात.

या वाहनांवरील माल झाकून ठेवणारा टप १५ ते २० फूट उंचीचा असतो. वाहन चालकाला रात्रीच्या वेळेत ९० फुटी रस्त्यावरील पथदिवे आणि स्मार्ट सिटी योजनेतून लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या उंचीचा अंदाज येत नसल्याने अवजड वाहन चालक भरधाव वाहन चालवून या रस्त्यावरील पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोडतोड, तर याच रस्त्यावर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलत असल्याचा प्रकार या भागातील स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आला आहे.

गेल्या महिन्यात अशाच मालवाहू वाहन चालकाने ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोडतोड, पथदिव्यांना धक्का पोहचविला होता. याविषयीची माहिती मिळाल्यावर पालिकेच्या विद्युत आणि स्मार्ट सिटी विभागाने या रस्त्याची पाहणी केली. त्यांना उंच टप असलेल्या अज्ञात वाहन चालकाने या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे, पथदिव्यांना धोका पोहचविला असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर विद्युत विभाग आणि स्मार्ट सिटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नासधूस प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

गेल्या आठवड्यात अशाच पध्दतीने उंच टप असलेले एक अवजड मालवाहू वाहन ९० फुटी रस्त्यावर उभे होते. या वाहनाने पथदिवे, सीसीटीव्हीची मोडतोड केली नसली तरी सीसीटीव्हीच्या दिशा मात्र बदलल्या असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या सूचनेवरून डोंबिवली विभागाचे अभियंता जितेंद्र शिंदे यांनी ९० फुटी रस्त्यावरील पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यावेळी तशी नासधूस कोणी केली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही अवजड वाहने ९० फुटी रस्त्यावर आली की नियमितच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.