ठाणे : ठाणे जिल्ह्यातील खाडीत बेकायदा रेती उपसा करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून अशाचप्रकारे गुरूवारी जिल्हा प्रशासनाने कळवा येथील खारेगाव भागातील रेतीबंदर खाडी पात्रात बेकायदा रेती उपसा करून त्याची वाहतूक करणाऱ्या रेतीमाफियांवर कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ८० लाख रुपयांचे रेती उपसा करणारे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात खाडी परिसर लाभला आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली शहरातून ही खाडी जाते. या शहरातील खाडी पात्रातून यापुर्वी डुबी पद्धतीने रेती उपसा केला जात होता. मात्र, आता डुबी रेती उपसा पद्धत बंद झाली असून आता संक्शन पंपाद्वारे बेकायदा रेती उपसा करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यामुळे खाडी पात्राला धोका निर्माण होण्याची भिती सातत्याने व्यक्त होत असून या बेकायदा रेती उपसा करण्याच्या मुद्द्यावरून जिल्हा प्रशासनावर सातत्याने टिका होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून अशा रेती उपसा करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. परंतु यानंतरही रेती उपसा थांबलेला नसल्याची बाब पुन्हा एकदा पुढे आली आहे.
कळवा येथील खारेगाव भागातील रेतीबंदर खाडीत बेकायदा रेती उपसा सुरू होता. याबाबत माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाच्या महसुल आणि तहसील विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने येथे कारवाई केली. या कारवाईमध्ये एक जेसीबी आणि एक ट्रक आणि दोन मोटरसायकल असा ८० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, ठाणे तहसीलदार उमेश पाटील, बाळकूम मंडळ अधिकारी शशिकांत जगताप, सहाय्यक महसूल अधिकारी जीवन ससाने यांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापुढे अनधिकृत रेती उपसा आणि वाहतुकीवर अशीच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.