ठाणे : ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील ६७ कर्मचाऱ्यांना प्रशासनाने पदोन्नती देण्यात आली असतानाच त्यापाठोपाठ ३८ उपशिक्षक आणि ५३ वरिष्ठ लिपिकांना प्रशासनाने पदोन्नती दिली आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण १५८ जणांना पदोन्नती मिळाली आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदस्थापना लवकरच होणार, असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आठ ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक अधिकारी- कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे अनेक पदे रिक्त होती. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या पदोन्नतीबाबत निर्णय घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या ३८ उपशिक्षक आणि ५३ वरिष्ठ लिपिकांची पदोन्नतीचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी बुधवारी काढले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मान्यतेने ही पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या सेवेतील ३८ उपशिक्षकांना (प्राथमिक विभाग, मराठी माध्यम) मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तर, ५३ वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन उपअधिक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

त्यापूर्वी, मंगळवारी, वरिष्ठ लिपिक या पदावर ४६ जणांना, अग्निशमन प्रणेता (लिडिंग फायरमन) या पदावर १९ जणांना, तर सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर २ जणांना पदोन्नती देण्यात आली. आतापर्यंत एकूण १५८ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीच्या या निर्णयांमुळे महापालिका कर्मचारी, शिक्षक यांच्यात आनंदाचे वातावरण असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आभार मानले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही पदोन्नत्तींबाबत शासनाकडून सुस्पष्ट आदेश प्राप्त झाले. त्यामुळे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्या पदोन्नत्ती करणायासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश आस्थापना विभागाला दिले होते. त्यानुसार, मंगळवारी एकूण ६७ कर्मचारी आणि बुधवारी एकूण ९१ कर्मचारी यांच्या पदोन्नती करण्यात आल्या आहेत. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदस्थापना लवकरच होणार, असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.