उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. टीम ओमी कलानी (टीओके) या प्रभावी गटातील माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष व मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, जिलाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या उपस्थितीत हा भव्य प्रवेश झाला.

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपने एकहाती सत्तेच्या दिशेने हालचाली सुरू केल्याचे बोलले जाते आहे.

उल्हासनगर शहरात एकीकडे महापालिका प्रशासनाने आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर प्रारूप प्रभाग रचना घोषीत केली. तर दुसरीकडे त्याचवेळी भाजपाने शहरात मोठी राजकीय खेळी केली. गेल्या काही दिवसांपासून भाजप स्थानिक स्तरावर पक्ष मजबूतीसाठी आक्रमक पवित्रा घेत आहे.

दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सतरामदास जेसवानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपात प्रवेश करून मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता भाजपचे कट्टर विरोधक असलेल्या टीम ओमी कलानीसारख्या प्रभावी गटातील नेत्यांना आपल्या गळाला लावून भाजपने थेट सत्ता समीकरणाकडे वाटचाल केल्याची चर्चा रंगली आहे.

भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रभुनाथ गुप्ता, बाबू गुप्ता, संजय सिंग चाचा, मंगल वाघे, छाया चक्रवर्ती, हेमा पिंजानी, सुचित्रा सिंह, सूरज भारवानी, किशन लचानी, चांदनी श्रीवास्तव, मनीषा मेथवानी, दशरथ खैरनार यांचा समावेश आहे. या प्रवेश सोहळ्यास श्वेता शालिनी, माधवी नाईक, विक्रांत पाटील, महेश सुखरमानी, जमनू पुरस्वानी, प्रकाश माखीजा, प्रदीप रामचंदानी, प्रशांत पाटील, राजू जग्यासी, रामचार्ली पारवानी, अमित वाधवा, दीपक छतलानी आदी मान्यवरांसह भाजपचे अनेक पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

कलानीं शिंदेंसोबत व्यस्त, भाजपकडून पदाधिकारी फस्त विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून टीम ओमी कलानीची शिवसेना शिंदे गटाशी जवळीक वाढत असल्याची चर्चा होती. एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना चक्क टीम कलानीचे सर्वेसर्वा ओमी कलानी यांनी आपल्या वाहनातून सारथ्य करत शहरात फिरवले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत कलानी आणि शिवसेना एकत्र येत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, नेमक्या या पार्श्वभूमीवर भाजपानेच कलानी गटातील माजी नगरसेवक व पदाधिकारी आपल्या गळाला लावले आहेत. त्यामुळे शिंदे गटालाही हा मोठा धक्का मानला जातो आहे.

भाजप स्वबळावर ?

गेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेपासून दूर सारण्यासाठी भाजपने टीम ओमी कलानीला जवळ केले होते. त्यांच्या मदतीने पालिकेत आपला महापौर निवडून आणला होता. मात्र आता कलानी आणि भाजपात मोठे वितुष्ट निर्माण झाले आहे. त्यामुळे भाजपने स्वबळावर पालिकेत लढण्याचीत तयारी सुरू केल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि टीओके अशा दोन गटांना सलग धक्का दिल्याने भाजपाने स्थानिक राजकारणात स्वबळावर जाण्याची पाऊले टाकल्याचे बोलले जाते.