ठाणे – घोडबंदर येथील एका गृहसंकुलाजवळील वृक्षांची फांदी छाटण्याचे काम सुरू असताना फांद्यांवरील काही घरटी खाली कोसळून पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकरणात गृहसंकुलाचे सचिव, अध्यक्ष यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच वृक्ष छाटल्याप्रकरणी महापालिकेने देखील कासारवडवली पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तर, जखमी पक्ष्यांपैकी पाच पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने आता मृत पक्ष्यांची संख्या ५० इतकी झाली आहे.

घोडबंदर येथील आनंदनगर भागात ऋतू एनक्लेव्ह या गृहसंकुलाजवळील वृक्षांच्या फांदी छाटणी दरम्यान गुरूवारी ४५ पक्ष्यांच्या मृत्यु झाला होता. तसेच या घटनेत अनेक अंडी खाली पडून फुटली. याप्रकरणी पक्षीप्रेमींनी आवाज उठवत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. गुरूवारी रात्री महापालिकेने गृहसंकुलाच्या पदाधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांची चौकशी करण्याबाबतचे पत्र कासारवडवली पोलिसांना पाठवले. तर, वनविभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर गृहसंकुलाचे सचिव, अध्यक्ष यांच्यासह तिघांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला.

आणखी पाच पक्ष्यांचा मृत्यू

गुरूवारी या घटनेत ४५ पक्षी मृत पावले होते. तर, शुक्रवारी मृतांच्या आकड्यात वाढ झाली. जखमी अवस्थेत उपचार घेत असलेल्या आणखी पाच पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मायपलक्लब फाऊंडेशनच्या संचालक आदिती नायर यांनी दिली. तर सुमारे २० पक्षी वाईल्ड लाईफ असोसिएशन या संस्थेकडे सोपावण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेत मृत पावलेले पक्षी मे महिन्याच्या शेवटी या परिसरात स्थलांतर करतात. जूनच्या दरम्यान त्यांचा प्रजननाचा काळ असतो. या पक्ष्यांच्या पिल्लांची सप्टेंबरपर्यंत पुर्ण वाढ होऊन ते भरारी घेतात. त्यानंतर हे पक्षी या परिसरातून पुन्हा स्थलांतरित होतात, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्यावतीने देण्यात आली.