ठाणे : Dahihandi 2025 दहीहंडीची पंढरी म्हणून ठाणे शहराला ओळखले जाते. लाखो रुपयांची बक्षिसे, ‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत गोविंदा पथकांचे निघणारे जथ्ये आणि मनोरंजन हे समीकरण मागील कित्येक महिन्यांपासून ठाणे शहरात पाहायला मिळते. ठाण्यातील दहीहंडी पाहण्यासाठी विविध शहरांतून नागरिक येत असतात. परंतु तुम्ही ठाण्यातील मानाच्या पाच दहीहंडींना नक्की भेट देऊ शकता. वाचूया कोण-कोणत्या या हंडी आहेत.
दिवंगत आनंद दिघे यांची दहीहंडी – शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी ठाण्यातील टेंभीनाका येथे दहीहंडी उत्सव सुरु केला होता. आता टेंभीनाका मित्र मंडळाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने हा उत्सव साजरा केला जात आहे. या दहीहंडी महोत्सवात मुंबई व ठाण्यातील गोविंदासाठी वेगवेगळी हंडी लावण्यात येणार आहे. मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी १ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी १,००,०००/- रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी १० हजार, सहा थरांसाठी ७ हजार, पाच थरांसाठी ५ हजार तर चार थरांसाठी ४ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
कसे जाल- ठाणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर चालत अवघ्या १० ते १५ मिनीट अंतरावर ही हंडी आहे. टेंभीनाका येथील आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाजवळील चौकात ही हंडी आयोजित केली जाते.
आनंद चॅरिटेबल ट्रस्ट- आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांच्या माध्यमातून ही हंडी आयोजित केली जाते. या हंडीला देखील मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथके थर रचण्यासाठी येत असतात. येथे रात्रीच्या वेळेतील लेझर शो विशेष आकर्षण असते. ही हंडी टेंभीनाका येथील हंडीपासून हाकेच्या अंतरावर आहे. अनेकदा आदित्य ठाकरे देखील या हंडीसाठी येत असतात.
कसे जाल- मासुंदा तलाव येथे या हंडीचे आयोजन केले जाते. स्थानकापासून अवघ्या १० मिनीटाच्या अंतरावर ही हंडी आहे.
संस्कृती युवा प्रतिष्ठान – संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने या हंडीचे आयोजन केले जाते. यंदा स्पेनमधील १११ गोविंदा ठाण्यात दाखल झाले आहेत. हे गोविंदा येथे थर रचणार असून त्यांची थर लावण्याची शिस्तबद्धता सर्वांना आकर्षित करते. या ठिकाणी देखील लाखो रुपयांची बक्षिसे असतात. येथे गोविंदा पथकांनी विश्वविक्रम केले आहेत.
कसे जाल- वर्तकनगर येथील ठाणे महापालिका शाळा क्र. ४४ च्या मैदानात ही दहीहंडी आयोजित केली जाते. ठाणे रेल्वे स्थानकापासून वर्तकनगर हे बसगाडी किंवा रिक्षाने किमान २० ते ३० मिनीटांच्या अंतरावर आहे.
संकल्प प्रतिष्ठान- संकल्प प्रतिष्ठानाच्या माध्यमातून शिंदे गटाचे माजी आमदार रविंद्र फाटक यांच्या वतीने २० वर्षांपासून या दहीहंडीचे आयोजन केले जाते. जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख २१ लाख रुपयांचे पारितोषिक, ठाणे व मुंबई उपनगरात सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणेतर्फे आयोजित दहिहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन ९ थर लावून सलामी देईल, त्या पथकाला ११ लाख रुपयांचे पारितोषिक व ९ थर लावणाऱ्या पथकासही लाखोंची बक्षिसे देण्यात येणार आहे. दिल्ली येथून खास कलाविष्कार सादर करण्यासाठी कलाकार यावर्षी संकल्प प्रतिष्ठानच्या दहिहंडी उत्सवात येणार असून इतर विविध कलाविष्कार यावेळी संकल्पच्या मंचावर सादर करण्यात येणार आहे.
कसे जाल- ठाण्यातील रहेजा गार्डन येथील संकल्प चौकात या हंडीचे आयोजन केले जाते. ठाण्यातील तीन हात नाका पासून अवघ्या पाच ते १० मिनीट अंतरावर ही हंडी आहे.
मनसेची हंडी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांच्या माध्यमातून या हंडीचे आयोजन केले जाते. या हंडीत विश्वविक्रम देखील रचले गेले. जय जवान गोविंदा पथक येथे विश्वविक्रमाचे थर रचण्यासाठी येत असतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील या हंडीला उपस्थितीत असतात. यावर्षी मराठीचा मुद्दा या हंडीत गाजण्याची शक्यता आहे.
कसे जाल- नौपाडा येथील भगवती शाळेच्या मैदानात हंडीचे आयोजन केले जाते. ठाणे स्थानकापासून गोखले रोडने चालत पाच ते सात मिनीटांच्या अंतरावर ही हंडी आहे.