ठाणे – पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी ब्रेक निकामी होऊन नियंत्रण सुटलेल्या कंटेनरच्या धडकेत १० ते १२ वाहनांना भीषण आग लागून आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, ठाण्यातही गुरुवारी सायंकाळी ठाणे महापालिका परिवहनाच्या टीएमटी बसगाडीचा अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले, ही घटना नेमकी काय आहे जाणून घेऊयात…

ठाणे शहरात दिवसभर लाखो प्रवासी कामासाठी ये-जा करतात. शहरातील विविध भागांमध्ये मोठ्याप्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि लघु उद्योग तसेच खासगी कार्यालये आहेत. शहरांमधून अनेक प्रवासी कामानिमित्त ठाणे शहरात येत असतात. तसेच काही प्रवासी कामानिमित शहराबाहेर जात असतात. रिक्षाने प्रवास करणे खर्चिक असल्याने टीएमटी बस सेवा नागरिकांसाठी स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय ठरते. ठाणे सॅटीसवरून पश्चिम व पूर्व दिशेला दिवसभरात विविध बसगाड्या सोडल्या जातात. सायंकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेत बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अशाच वाहतुकीच्या कालावधीत हा अपघात घडला.

घोडबंदर येथून ठाणे स्थानकाकडे जाण्यासाठी ठाणे महापालिका परिवहनाची टीएमटी बसगाडी मानपाडा – विद्यापीठ – कापूरबावडी- माजिवडा – गोकुळनगर – कोर्ट नाका मार्गे जाणार होती. ही बसगाडी मानपाडा परिसरातील एमजी हेक्टर शोरूमसमोर गुरूवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पोहचताच, चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बसगाडी थेट समोर असलेल्या इलेक्ट्रिक पोलवर जाऊन आदळली. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर मानपाडा वाहतूक पोलीस कर्मचारी आणि ठाणे पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे शुक्रवारी मध्यरात्री कॅडबरीकडून नितीन कंपनी जंक्शनकडे जाणाऱ्या वाहिनीवर एका कारचा अपघात झाला. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुुटल्याने वाहन एमएमआरडीएने बसवलेल्या बॅरिगेटसाठीच्या सिमेंट डिव्हायडर ब्लॉकला जोरदार धडकले. धडकेनंतर सिमेंटचा ब्लॉक रस्त्याच्या मधोमध घसरत आल्याने इतर वाहनांसाठी संभाव्य धोका निर्माण झाला. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पहारच्या मदतीने ब्लॉक रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. तसेच, अपघातग्रस्त वाहन टोईंगच्या मदतीने पोलिसांमार्फत रस्त्याच्या बाजूला करण्यात आले आहे. या घटनेत देखील कोणालाही दुखापत झालेली नाही.