Thane Rain News: ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी कायम होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने झाडे उन्मळून पडत आहेत. मंगळवारी रात्री अशाच एका घटनेत सुके झाड पडून दोन जण जखमी झाल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. तर, दिव्यात घरामध्ये पाणी शिरल्याने १३ रहिवाशी अडकले होते, त्यांची आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुटका केली.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसा दरम्यान अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडत आहेत. अशा घटनांमध्ये यापूर्वी जीवितहानी झाली आहे. यंदा मात्र अशा घटनेत सोमवरपर्यंत कोणी जखमी झाले नव्हते. मात्र मंगळवारी अशाच एका घटनेत दोन जण जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
ठाण्यातील तुळशीधाम हाईड पार्क येथे सुकलेले झाड मंगळवारी रात्री पडले, त्यात वसंतविहार मधील हर्षद सुरेश लाड (३३) आणि उपवन, कोकणीपाडा येथील नागेश दादाराव सूर्यवंशी (३६) हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये लाड यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे तर सूर्यवंशी यांना मुका मार लागला आहे. या घटनेची माहिती कृष्णा यादव यांनी दिल्यानंतर ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पडलेले झाड कापून एका बाजूला करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
दरवर्षी मुसळधार पावसादरम्यान दिवा परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचते. येथील चाळीतील घरांमध्ये पाणी शिरून घरातील साहित्याचे नुकसान होते. यंदाही हे चित्र कायम आहे. मनगलावरी दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. तसेच दिवा परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. असे असतानाच, दिव्यातील संतोष नगर येथील नाईक नगर चाळीमधील घरांमध्ये पाणी शिरल्याने १३ रहिवासी त्या पाण्यात अडकलेले होते. याबाबत माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या शीळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांची सुटका केली आहे. त्या रहिवाश्यांना तात्पुरत्या स्वरुपात त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.