Nirbhay Thane WhatsApp Chat Bot Service: ठाणे : ठाणे शहर पोलीस दलाने नागरिकांच्या सोयीसाठी आणि अधिक जनताभिमुख करण्याच्या उद्देशाने एक महत्वाची डिजिटल सेवा सुरु केली आहे. ‘निर्भय ठाणे’ व्हॉटसअप चॅट बॉट सेवा या नव्या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना पोलीस दलाच्या विविध सेवा आणि सुविधांचा ऑनलाईन लाभ घेता येणार आहे. या सेवेचा औपचारिक प्रारंभ ठाण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

या व्हॉटसअप चॅट बॉटच्या माध्यमातून नागरिकांना अनेक प्रकारच्या पोलीस सेवा उपलब्ध होणार आहेत. यात ऑनलाईन तक्रार नोंदणी, ई-चलन भरणा, हरविलेल्या किंवा सापडलेल्या वस्तूंची नोंद, सायबर गुन्ह्यांसाठी तक्रार, भाडेकरू नोंदणी, जवळपासचे पोलीस ठाणे शोधणे, लाईव्ह ट्रॅफिक अपडेट्स, ‘आपले सरकार’ सेवा, कायद्याची माहिती तसेच अभिप्राय नोंदणी यांसारख्या सुविधा समाविष्ट आहेत. यामुळे नागरिकांना पोलीस विभागाशी संपर्क साधण्यासाठी प्रत्यक्षपणे पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही.

नागरिकांना या सेवा घेण्यासाठी ७०३९४५५५५५ या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. ‘सदैव सेवेत, सदैव तत्पर’ या ब्रीदवाक्याचे पालन करत ठाणे पोलीस आयुक्तालयाने जनतेला अधिक कार्यक्षम सेवा देण्याचा दावा केला आहे. ठाणे पोलीस दलाने याबाबत नागरिकांना या नव्या सुविधा अधिकाधिक वापरण्याचे आवाहन केले आहे. ही डिजिटल सेवा नागरिकांच्या सोयीसाठी अत्यंत महत्वाची ठरलेली आहे, कारण ती नागरिकांच्या विविध समस्यांचा त्वरित आणि सुलभ पद्धतीने निराकरण करण्यास मदत करत आहे, अशी माहिती ठाणे पोलिस आयुक्तालयाकडून देण्यात आली.