ठाणे : शहरात प्राणवायुचे प्रमाण वाढावे आणि प्रदुषणात घट व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिकेने शहरातील महामार्गाच्या रस्त्यालगत तसेच दुभाजकांमध्ये बांबूची लागवड करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण विभागाने घेतला आहे. काही ठिकाणी रस्त्याच्याकडेला तीस फुटी तर, दुभाजकांमध्ये सात ते आठ फुटी बांबूच्या हिरव्या भिंती उभारल्या जाणार आहेत. ठाण्यातील आनंदनगर नाक्यापासून ते घोडबंदरपर्यंतही बांबू लागवड करण्यात येणार असून या कामाला काही ठिकाणी सुरूवातही झाली आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेने ‘उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियाना’ अंतर्गत वर्षभरात दोन लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. या अभियानात गेल्यावर्षी सव्वा लाख वृक्ष लागवड केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. यंदाही दोन लाख देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या अभियानात पळस, बेल, नीम, कांचन, सिताअशोक, जांभूळ, पारिजातक, शिसम, कोकम, शिवण, करंज, अडुळसा, तगर, लिंबू, कामिनी, बकूळ, या देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्याचबरोबर, बांबू प्रजातीची ५० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. आतकोली येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरात बांबू प्रजातींच्या पाच हजार झाडांची लागवड केली आहे. त्यापाठोपाठ आता ठाणे तसेत घोडबंदर भागातील महामार्गाच्या रस्त्यालगत तसेच दुभाजकांमध्ये बांबूची लागवड करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार, ठाणे आणि मुंबई शहराच्या वेशीवर असलेल्या दिपमाळा उभारण्यात आल्या आहेत. त्याशेजारी बांबूची झाडे लावण्यात येणार आहेत. आनंदनगर ते कोपरी पुल, कोपरी पुल ते माजीवाडा रस्त्यालगत तसेच दुभाजक, माजिवडा ते गायमुखपर्यतचा दुभाजक याठिकाणी बांबूची लागवड करण्यात येणार आहे. काही ठिकाणी रस्त्याच्याकडेला तीस फुटी तर, दुभाजकांमध्ये सात ते आठ फुटी बांबूच्या हिरव्या भिंती उभारल्या जाणार आहेत. २५ ते ३० हजार बांबूच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. घोडबंदर भागात दुभाजकांमध्ये बांबू लागवड कामाला सुरूवात झाली आहे.
कोट
शहरात प्राणवायुचे प्रमाण वाढावे आणि प्रदुषणात घट व्हावी या उद्देशातून शहरातील महामार्गाच्या रस्त्यालगत तसेच दुभाजकांमध्ये बांबूची लागवड करण्यात येत आहे. रस्त्याच्याकडेला तीस फुटी तर, दुभाजकांमध्ये सात ते आठ फुटी बांबूच्या हिरव्या भिंती उभारल्या जाणार आहेत. यामुळे वाहनांच्या आवाजामुळे परिसरात ध्वनी प्रदुषण होते, तेही बांबूच्या भिंतीमुळे कमी होईल. मधुकर बोडके उपायुक्त, ठाणे महापालिका