Thane News / ठाणे : आजच्या धकाधकीच्या आणि प्रदूषणग्रस्त जगात रुग्णालय हे केवळ उपचाराचे ठिकाण नसून मानसिक आधाराचे केंद्रही ठरते. याचे उत्तम उदाहरण ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या मनःशांतीसाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हिरवाईवर आधारित एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमातून रुग्ण, नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यांना ताणमुक्त, शांत आणि आनंददायी वातावरण मिळणार आहे.

एखाद्या रुग्णासाठी, आजाराशी लढताना डॉक्टरांचे उपचार आणि औषधे जितकी महत्वाची असतात. तितकेचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणे गरजेचे असते. या जाणिवेतून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी तसेच त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यांच्या उत्तम मानसिक स्वास्थ्यासाठी वृक्षारोपण हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.

सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात फळझाडे आणि स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात आली. आंबा, जांभूळ, चिकू यांसारखी फळझाडे आणि , वड, पिंपळ, नीम यांसारखे स्थानिक वृक्ष भविष्यात रुग्णालय परिसरात सावली, शुद्ध हवा आणि ताजेतवानेपणाचा श्वास घेऊन येतील.

रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्यासह या उपक्रमात रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, रुग्णसेवक, तसेच उपचारासाठी आलेले काही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. रोपे लावताना सर्वांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि डोळ्यात समाधानाची चमक होती.

हिरवाई ही फक्त सौंदर्यासाठी नसते, ती मनाला शांतता देते, आरोग्य सुधारते, आणि रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रक्रियेला गती देते. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या या उपक्रमामुळे, आजारपणाशी झुंजणाऱ्या प्रत्येकाला निसर्गाची मिठी मिळेल. झाडे मोठी होत गेली, की ती फळ देत राहतील, सावली देत राहतील आणि पिढ्यानपिढ्या आशेचा संदेश देत राहतील, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हा उपक्रम केवळ वृक्षारोपण नसून, निसर्ग आणि आरोग्य यांचा सुंदर संगम आहे. जिथे प्रत्येक पान रुग्णांना सांगेल, “तुम्ही एकटे नाही, निसर्ग तुमच्या सोबत आहे.” ठाणे सिव्हिल रुग्णालया बरोबर जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयात अशाच पद्धतीची वृक्षारोपण करण्यात आले आहे. आता पर्यंत सुमारे एक हजार वृक्षारोपण झाले आहे. – डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे.