ठाणे  : ठाणे शहरातील झोपडय़ा, चाळी तसेच बेकायदा इमारतींच्या पुनर्विकासाकरिता समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी ठाण्यात व्यक्त केले. ‘लोकसत्ता’च्या ‘तलाव ते टॉवर’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्या हस्ते शनिवारी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे झाले. या कार्यक्रमात शिंदे म्हणाले, ठाण्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. टॉवर उभे राहिले म्हणजे, शहराचा विकास झाला असे म्हणता येत नाही. प्रत्येक शहराला एक संस्कृती असते. ठाण्याला एक इतिहास आहे. पूर्वी नौपाडा परिसर म्हणजे ठाणे म्हणून ओळखले जात होते. आता ठाणे वाढत गेले आहे. वागळे इस्टेट परिसर हा औद्योगिक क्षेत्र होता. या कारखान्यांमध्ये हजारोंच्या संख्येने कामगार काम करीत होते. त्या कामगारांसाठी वागळे इस्टेट भागात चाळी उभारण्यात आल्या. त्यावेळी परवडणारी घरे उपलब्ध नसल्यामुळे गरजेपोटी या चाळींच्या दाटीवाटीने इमारती उभ्या राहिल्या. त्यानंतर या सर्व वस्तींना अनधिकृत इमारतींचा शिक्का लागला. या शहराला सुनियोजित शहर करायचे असल्यास त्याला क्लस्टरशिवाय पर्याय नाही. या योजनेसाठी नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये मैदाने, उद्यान, रुंद रस्ते तसेच इतर पायाभूत सोयीसुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. शहराला अधिकचे पाणी कसे उपलब्ध व्हावे याचे नियोजन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात येत असून  त्याचबरोबर तलावांचे सुशोभीकरणही करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 गृहनिर्माणमंत्री आव्हाड म्हणाले, ठाणे आणि मुंबई ही शहरे कष्टकऱ्यांमुळे उभी राहिली आहेत. वागळे इस्टेट हा परिसर आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जात होते. याठिकाणी काम करणाऱ्या कामगार वर्गाला परवडणारी घरे उपलब्ध होत नव्हती. यातूनच या कष्टकऱ्यांच्या वसाहती शहरांमध्ये उभ्या राहिल्या. त्यांना अनधिकृतचा ठपका लावला जातो. मात्र, या गरजेपोटी उभ्या राहिलेल्या वसाहती आहेत. याचाही विचार होणे गरजेचे आहे. या भागाचा सुनियोजित विकास करण्यासाठी क्लस्टर योजनेशिवाय पर्याय नाही. येऊर हे पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र आहे. या भागात विविध प्राणी-पक्ष्यांचा अधिवास आहे. या शांतता क्षेत्रामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या पाटर्य़ामध्ये ध्वनिक्षेपकाचा वापर केला जातो. त्याचा आवाजही मोठा असतो. यामुळे येथे अनेक प्राणी-पक्ष्यांचा वावर कमी होत आहे. या भागातील ध्वनिक्षेपकाचा आवाज बंद करावा अशी सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली. या भाषणादरम्यान मंत्री आव्हाड यांनी ठाण्याचा इतिहास उलगडला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane cluster plan opinions urban development minister eknath shinde housing minister jitendra awhad ysh
First published on: 01-05-2022 at 01:35 IST