अद्याप अधिसूचना नाही; श्रेय घेणारे सत्ताधारी तोंडघशी

ठाणे महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी तसेच धोकादायक इमारतींसाठी समूह विकास योजना (क्लस्टर) मंजूर करून काही महिने उलटले तरी यासंबंधीची अधिसूचना सरकारने अद्याप काढलेली नसल्याचे बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आले. त्यामुळे या योजनेचे भवितव्य अधांतरी असून, योजनेच्या मंजुरीनंतर शहरभर फलकबाजी करून श्रेय घेणारे शिवसेना-भाजप ऐन निवडणुकीच्या तोंडावर तोंडघशी पडले आहेत.

ठाणे, कळवा व मुंब्रा परिसरात इमारत कोसळून त्यात जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांच्या पाश्र्वभूमीवर महापालिका क्षेत्रात क्लस्टर योजना लागू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यायाठी राजकीय पक्षांनी शहरात आंदोलने केली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने क्लस्टर योजनेस मंजुरी दिल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर शिवसेना-भाजपमध्ये श्रेयासाठी आटापिटा सुरू होता. दोन्ही पक्षांनी शहरामध्ये फलकबाजी केली होती. योजनेस मंजुरी मिळाल्याने ती आज ना उद्या शहरात राबविली जाईल, असे नागरिकांना वाटत होते. मात्र, त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत श्रीरंग सोसायटीच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित झाला. या चर्चेदरम्यान क्लस्टर योजनेची सद्य:स्थिती नेमकी काय आहे, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावेळी राज्य शासनाने क्लस्टर योजनेला मंजुरी दिली असली तरी त्यासंबंधी अद्याप अधिसूचना काढलेली नसल्याचे पालिकेचे नगररचनाकार प्रदीप गोईल यांनी स्पष्ट केले. या माहितीमुळे क्लस्टरच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष तोंडघशी पडले आहेत. तसेच क्लस्टरची अंमलबजावणी झाली नसतानाही त्यासाठी पोस्टर, बॅनरबाजी आणि सत्कार कशासाठी करून घेतले, असा सवाल करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.

श्रीरंग सोसायटी पुनर्विकासासाठी बैठक

श्रीरंग सोसायटी पुनर्विकासासंबंधीच्या प्रस्तावास २०१४ मध्ये मंजुरी मिळाली आहे. पण स्थानिक रहिवाशांनी त्यास विरोध करत स्वत: पुनर्विकास करण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी आता पुन्हा प्रस्ताव सादर केला असून, त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विधि सल्लागारांचा अभिप्राय मागवून त्यासंबंधीची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर विकास विभागाने स्थायी समिती बैठकीत दिली. दरम्यान, या सोसायटीच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकर निकाली निघावा म्हणून सभापती संजय वाघुले यांनी दिवाळीनंतर एक बैठक आयोजित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या बैठकीत सोसायटीच्या समितीचे दोन पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शहर विकास व विधि विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.