ठाणे : महसूल दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.विकास खरगे, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी उपस्थित राहत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ठाण्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी जिल्ह्यातील नवीन प्रकल्पाबाबत मोठी घोषणा केली.
महसूल दिनानिमित्त अपर मुख्य सचिव डॉ.विकास खरगे यांच्या हस्ते कोकण विभागातील सात जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कल्पना साठे यांनी केले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, अपर आयुक्त वैशाली इंदानी, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके, सह आयुक्त रवी पाटील, रविंद्र पवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, अमित सानप, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, व्याख्याते डॉ.दत्ता कोहिनकर, आदि मान्यवर उपस्थित होते.
महसूल विभाग हा शासनाचा चेहरा
समाजाची सेवा करण्यासाठी शासकीय नोकरी हे एक महत्वाचे क्षेत्र असून आपण प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली पाहिजे. महसूल विभाग हा शासनाचा चेहरा आहे. महसूल विभागाने कोणती कामे केली आहेत आणि कोणती कामे करणार आहे, हे जनतेपर्यंत पोहोचविले पाहिजे. महसूल विभागाने लोकांसाठी अधिक जबाबदारीने, पारदर्शक आणि विश्वासार्हपणे काम केले पाहिजे. महाराष्ट्राचे नाव देशातच नाही तर जगामध्ये घेतले जाते. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजक गुंतवणूक करीत आहेत. देशाच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा १५ टक्के वाटा आहे. आपले राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे, असे अपर मुख्य सचिव डॉ.विकास खारगे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.
म्हणूनच महसूल विभागाकडे काम सोपविले जाते
महसूल दिनानिमित्त पुरस्कार मिळालेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ज्यांना पुरस्कार मिळाल नाही त्यांनी आजून जोमाने काम करुन पुढच्या वर्षी पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. महसूल विभाग सर्व स्तरावर काम करतो. कोणतीही आपत्ती असो महसूल विभाग नागरिकांना सेवा पुरविण्यात अग्रेसर असतो. कोणतेही काम यशस्वी करायचे असेल तर ते काम महसूल विभागाकडे सोपविले जाते, असे कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा
महसूल सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. शासन आणि प्रशासनाची सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगली प्रतिमा होण्यासाठी महसूल सप्ताहानिमित्त विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. नागरिकांना लोकाभिमुख सेवा उपलब्ध करुन देणे ही महसूल विभागाची जबाबदारी आणि दायित्व आहे. त्यानुसार नागरिकांना उत्तम दर्जाची सेवा पुरविण्यासाठी महत्वाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी मॉडेल सेतू केंद्र तयार करण्यात येणार आहे. आपले सरकार सेवा केंद्राद्वारे गाव पातळीवर सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. डेटा बँक तयार करणार आहे. अशी घोषणा ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी यावेळी केली.