ठाणे : घोडबंदर मार्गावरील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या कासारवडवली येथील उड्डाणपूलाची मार्गिका खुली झाल्याने कासारवडवली चौकात होणाऱ्या वाहतुक कोंडीतून वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी कासारवडवली येथून आता वाहनांचा भार गायमुख घाटात येऊ लागला आहे. या घाट रस्त्याची अवस्था वाईट असून मार्गिका अरुंद आहे. येथील वाहतुक कोंडीतून ठाणेकरांची अद्याप सुटका झालेली नाही. त्यामुळे कासारवडवली कोंडीतून दिलासा पण घाटात कोंडी अशी स्थिती वाहन चालकांची झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या घोडबंदर मार्गावरून हजारो हलकी वाहने तसेच उरण जेएनपीटी, भिवंडी येथून सुटणारी अवजड वाहने वसई, गुजरातच्या दिशेने वाहतुक करतात. याच मार्गावर मेट्रो चार (वडाळा-घाटकोपर ते कासारवडवली) आणि चार अ (कासारवडवली ते गायमुख) या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी अडथळे बसविण्यात आले असून त्याचा परिमाम वाहतुक व्यवस्थेवर होतो.
गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच कासारवडवली उड्डाणपूलाच्या निर्माणाचे कामही सुरु होते. येथील उड्डाणपूलालगतच्या रस्त्याची अवस्था अक्षरश: चाळण झाली होती. कासारवडवली भागातील अरुंद मार्गिका आणि खड्ड्यांमुळे कासारवडवली, आनंदनगर, वाघबीळ भागात दररोज वाहतुक कोंडी होत होती.
नुकताच, येथील कासारवडवली पूलाची ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाली आहे. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु आता कासारवडवली उड्डाणपूलावरून सुसाट जाणारी वाहने गायमुखच्या घाटात आल्यानंतर कोंडीत अडकत आहेत. एकाचवेळी वाहने घाटात जात असल्याने या मार्गावर वाहनांचा भार वाढत आहे. येथील मार्गिकेवर काही ठिकाणी रस्त्याची अवस्था वाईट आहे. तसेच वाहिनी देखील अरुंद आहे. त्यामुळे कोंडीत भर पडते. घाटातील ही वाहतुक कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकी नऊ येऊ लागले आहेत.
कासारवडवली येथील उड्डाणपूलाची मार्गिका खुली झाल्याने येथील वाहतुक कोंडीतून १०० टक्के दिलासा मिळत आहे. पूर्वी या भागात वाहतुक कोंडी होत होती. – पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
गायमुख घाटात वाहतुक करताना कोंडीचा त्रास होतो. वाहतुक कोंडीतून मार्ग काढताना अनेक अडचणींचा समाना करावा लागतो. – अंकिश शेलार, प्रवासी.